scorecardresearch

ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शरदिनी गोळे यांचे निधन

गेल्या सहा दशकांपासून नृत्य क्षेत्रात योगदान देत अनेक शिष्य घडविणाऱ्या ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शरदिनी दामोदर गोळे (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शरदिनी गोळे यांचे निधन
ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शरदिनी गोळे

पुणे : गेल्या सहा दशकांपासून नृत्य क्षेत्रात योगदान देत अनेक शिष्य घडविणाऱ्या ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शरदिनी दामोदर गोळे (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ कथक नृत्यगुरू दिवंगत रोहिणी भाटे यांच्या त्या ज्येष्ठ शिष्या होत्या.

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर स्फोटाने जमीनदोस्त; राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंदच

हेही वाचा >>> ‘बेस्ट’ची विजेवर धावणारी वातानुकूलित दुमजली बस लवकरच; पुण्यात चाचणी सुरू

मुंबई येथे जन्मलेल्या शरदिनी गोळे यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच नृत्याची आवड असलेल्या शरदिनी यांनी विविध गुरूंकडे नृत्याचे धडे गिरवले. पण, वयाच्या चौदाव्या वर्षी रोहिणी भाटे यांच्याकडे कथक नृत्य शिकायला सुरुवात केली. हाच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. नृत्यलंकार पदवी संपादन केल्यानंतर त्यांचा नृत्य क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. तत्कालीन पुणे विद्यापीठातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्यांनी कथक नृत्यात एम. ए. पदवी मिळवली. लालित्य आणि सहजसुंदर अभिनय हे त्यांच्या नृत्याचे वैशिष्ट्य होते. नृत्यभारती संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमांत रोहिणी भाटे यांच्यासह त्यांनी सादर केलेले अनेक कार्यक्रम गाजले. सवाई गंधर्व संगीत महोत्सवात त्यांच्या कथक नृत्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली होती. दिल्ली येथील शरदचंद्रिका महोत्सव, संगीत नाटक अकादमी, कथक कला केंद्रातर्फे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. नृत्यभारती संस्थेद्वारे त्यांनी अनेक वर्षे विद्यादान करून अनेक शिष्य घडविले. पुणे महापालिकेतर्फे पंडिता रोहिणी भाटे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. संगीत नाटक अकादमीच्या संग्रहालयामध्ये त्यांच्या नृत्याभिनयाच्या कार्यक्रमांचे जतन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या