पुणे : कात्रज -कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे जोरदार पडसाद पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या नगरसेवकांनी यावर प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, दोषी प्रशासनावर कारवाई झालीच पाहिजे,’ अशी मागणी करून या प्रकरणाला जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की नाही,’ असा प्रश्न सदस्यांनी विचारला.

कात्रज-कोंढवा रस्त्यावर आतापर्यंत २१ जणांचे बळी गेले असून, अद्याप महावितरणचे खांब हटविण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला. १५० कोटी रुपये खर्च करूनही रस्ता पूर्ण होत नाही. तसेच ६० कोटी रुपये देऊन देखील चौकांमध्ये वाहतूक वॉर्डन उपस्थित नसतात. प्रशासन कधी जबाबदारी घेणार,’ असा संतप्त सवाल त्यांनी केला.

‘नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी देखील रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून प्रशासनावर टीका केली. स्थायी समितीचे अध्यक्ष असताना हा रस्ता पीपीपी तत्त्वावर पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्या वेळी आपल्यावर टीका करण्यात आली आणि रस्त्याला विरोध झाला. मात्र, आज या रस्त्यावर नागरिकांचे बळी जात आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे गांर्भीयाने पाहिले पाहिजे,’ असे त्यांनी सांगितले.

नगरसेवक गफूरभाई पठाण यांनी कोंढवा परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. डीपी रस्ते, पाणी आणि कचरा यांसारखे प्रश्न अद्याप कायम आहेत. प्रशासनच राजकारण करीत असल्याचा आरोप करत हे प्रश्न नेमके कोणाकडे मांडायचे? असा संतप्त सवाल त्यांनी केला. या रस्त्याच्या कामाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केला.

शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी रस्त्याचे काम पूर्ण करण्याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. ‘एफएसआय’ आणि ‘टीडीआर’च्या माध्यमातून आवश्यक जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुमारे दहा जागामालक रोख स्वरुपात मोबदला मागत असून, त्यांचा प्रश्न येत्या दोन ते तीन आठवड्यांत सोडविण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर संपूर्ण रस्त्याचे काम सहा ते सात महिन्यांत पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मार्च २०२७ पर्यंत रस्ता पूर्ण करणार

कात्रज कोंढवा रस्त्यासाठी आवश्यक ती निधीची तरतूद केली जात आहे. हा रस्ता ८४ मीटर रुंदीचा केला जाणार होता. मात्र भूसंपादन करण्यामध्ये येत असलेल्या अडचणी लक्षात घेता हा रस्ता सध्या ५० मीटर रुंदीचा केला जाणार आहे. मार्च २०२७ पर्यंत हा रस्ता पूर्ण होईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सभागृहात सांगितले. हा रस्ता ८४ मीटर करण्याचे नियोजन असून त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यात येत आहे. दोन वर्षांमध्ये ८४ मीटर रस्ता कसा करता येईल, यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे आयुक्त राम यांनी स्पष्ट केले.