पुणे : शहराच्या दक्षिण भागातील वाहतूक कोंडीचा होत असलेला गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. कोंडी सोडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
या रस्त्यासाठी आवश्यक जमीन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मालमत्ताधारकांविरुद्ध सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रस्ता तयार करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात आलेल्या जागांवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवरही लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
कात्रज ते कोंढवा हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग मानला जातो. वाढती लोकसंख्या, वेगाने वाढणाऱ्या गृहसंकुले आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे या मार्गावर दिवसाच्या बहुतांश वेळेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी होत असली तरी जमीन संपादन आणि अतिक्रमणांच्या गुंत्यात हा प्रकल्प रखडला होता.
महापालिकेने आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर आवश्यक जागा ताब्यात घेतली असली तरी काही मालमत्ताधारकांकडून अद्याप जागा हस्तांतरित करण्यात आलेली नाही. प्रशासनाने यापूर्वी संबंधितांना वारंवार नोटिसा देऊन आणि चर्चेद्वारे जागा स्वेच्छेने देण्याचे आवाहन केले होते. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेच्या ताब्यात आलेल्या जागांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम लवकरच सुरू होणार आहे. तसेच जागा न देणाऱ्या मालकांविरोधात कायद्यानुसार सक्तीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील प्रमुख अडथळे दूर होऊन प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रस्तारुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कात्रज, कोंढवा, खडी मशिन चौक तसेच परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित आहे. दररोज वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुकर होणार आहे, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या रस्त्याचे भूसंपादन करून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरू व्हावा, यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम विशेष आग्रही आहेत. जे नागरिक टीडीआर तसेच एफएसआय देऊनही जागा ताब्यात देण्यास तयार नसतात त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी रोख रक्कम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे.
काय म्हणाले महापालिका प्रशासन
- रखडलेल्या प्रकल्पाला मिळणार नवा वेग
- जमीन न देणाऱ्यांवर सक्तीच्या भूसंपादनाची कारवाई
- ताब्यातील जागांवरील अतिक्रमणे हटविणार
- कात्रज-कोंढवा मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार
- खडी मशिन चौक परिसरातील वाहतुकीलाही दिलासा
- हजारो वाहनचालकांचा प्रवास होणार अधिक सुलभ व सुरक्षित
