पुणे : ‘दक्षिण पुण्याचे प्रवेशद्वार असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जोरदार सुरू असून, या रस्त्याचे काम पूर्ण करून मार्च २०२७ मध्ये उद्घाटन होईल,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त राम यांनी कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी करून तेथील कामाचा आढावा घेतला. या वेळी आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह पथ विभागाचे प्रमुख राजेश बनकर, उपायुक्त निखील मोरे, विद्युत विभागाच्या प्रमुख मनिषा शेकटकर यांच्यासह विशेष भूसंपादन कार्यालय आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. सद्य:स्थितीत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेल्या १० खासगी मालकांच्या मिळकती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्त्यामध्ये ज्या मालकांच्या मिळकती जात आहेत, त्यांना आवश्यक तो मोबदला देऊन जागा ताब्यात घेतल्या जात आहेत. मार्च २०२७ पर्यंत सर्व जागा ताब्यात घेऊन रस्त्याचे उद्घाटन करून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांपासून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम निधी अभावी रखडले होते. मात्र राज्य सरकारने या भागातील भूसंपादनासाठी महापालिकेला काही प्रमाणात निधी उपलब्ध करून देत मदत केल्याने या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे विशेष प्रयत्नशील आहेत.
महापालिकेने हा रस्ता ८४ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भूसंपादनासाठी होणारा विलंब लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरुपात हा रस्ता सध्या ५० मीटर रुंद केला जात आहे. दोन वर्षांमध्ये आवश्यक भूसंपादन करून रस्ता ८४ मीटर रुंद करण्याचे नियोजन महापालिकेचे असल्याचे आयुक्त राम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या रस्त्याच्या पाहणी दौऱ्यात कामात येत असलेल्या विविध अडथळ्यांचा आढावा आयुक्तांनी घेतला. सद्य:स्थितीत सेवा रस्त्याचे बहुतांश काम पूर्णत्वास आले असून, ‘ग्रेड सेपरेटर’च्या कामासाठी अडथळा ठरणारे विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर तातडीने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, रखडलेल्या भूसंपादनाच्या प्रकरणांमध्ये संबंधित जागामालकांशी संपर्क साधून एक महिन्यात संमती घेऊन रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर म्हणाले, कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी ठरवून दिलेल्या वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
