पुणे : बहुचर्चित कात्रज-येरवडा ‘ट्वीन टनेल’च्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश संस्था (एसपीव्ही) स्थापन करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भातील आदेश दिले आहेत.
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कात्रज ते येरवडा भुयारी मार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला गती देण्यासंदर्भात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अर्थसंकल्पीय बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावेळी कामाला गती देण्यासाठी ‘एसपीव्ही’ स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील चार प्रमुख महामार्गांना जोडणाऱ्या ४५ किलोमीटर लांबीच्या भूमिगत रस्त्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू झाली आहे. या संदर्भातील आराखडा सल्लागार कंपनीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) दिला आहे. त्यासाठी २० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शहरात पूर्व ते पश्चिम जोडणारे अनेक रस्ते आहेत. पण उत्तर ते दक्षिण जोडणारे मार्ग कमी आहेत. त्यामुळे ‘पीएमआरडीए’ने येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग करण्याचे प्रस्तावित आहे.
या प्रकल्पामुळे कात्रज ते येरवडा या दरम्यानचा प्रवास अवघ्या २५-३० मिनिटांत शक्य होणार आहे. तसेच एका बाजूने वाहने येण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिकाही प्रस्तावित आहेत. या प्रकल्पासाठी मोनार्क या सल्लागार कंपनीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होणार असून, अंतर्गत दळणवळण गतिमान होणार असल्याचा दावाही केला जात आहे.
कात्रज ते येरवडा भुयारी मार्गाच्या कामासाठी स्वतंत्र विशेष उद्देश संस्था निर्माण करावी. त्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा. तसेच पीएमआरडीए, पुणे महापालिकेने संयुक्तपणे कार्यवाही करावी. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
