पुणे: केरळमध्ये विधानसभा निवडणुकीत तिरुअनंतपुरम शहरात रस्ते, पायाभूत सुविधांचा अभाव, बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवर मतदारांमध्ये नाराजी असून मतदारांनाही सत्ताबदल हवा आहे. अशी माहिती आज एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्मेंट संस्थेतील विद्यार्थ्यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेतील दिली.
एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्मेंट संस्थेतील १६ विद्यार्थी केरळ मधील तिरुअनंतपुरम इथे विधानसभा निवडणूक अभ्यास दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी १८०५ मतदारांशी संवाद साधला. यामध्ये ३७ टक्के मतदार हे २६ ते ४० वयोगटातील होते. मतदार संघातील वस्त्यांमध्ये, चहाच्या टपरीवर, बाजारात, महाविद्यालये आणि विद्यापीठ अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी मतदारांशी संवाद साधत सर्वेक्षणाचा अहवाल तयार केला हा अहवाल आज त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केला.
केरळ विधानसभा निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाबद्दल आणि सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी पक्षाबद्दल मतदारांमध्ये फारसा रोष नोंदवला नसला तरी २७ टक्के मतदारांनी काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडी बद्दलही सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. अशी माहिती ऋषिकेश कुलकर्णी यांनी दिली. पुढील मुख्यमंत्री कोण असावा या प्रश्नाच्या उत्तरात सर्वेक्षणातील ३५ टक्के मते विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना तर २२ टक्के मते भाजपचे राजीव चंद्रशेखर यांना तर वीस टक्के मते विधानसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे व्ही. डी. सथीसन आणि ११ टक्के मतदारांनी काँग्रेसच्या शशी थरूर यांना पसंती दिली.
सर्वेक्षण करताना भाषेची अडचण आणि बहुतांश मतदारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याने फारसा संवाद साधता आला नसल्याचे अजिंक्य मोरे आणि अनुष्का गावंडे यांनी सांगितले.
