Ketan Agarwal Lohagad Fort Murder Case: लोणावळ्या जवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून पडल्यामुळे झालेल्या पुणेकर तरुण केतन अग्रवाल (वय २६) याच्या मृत्यू प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला निव्वळ अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक क्रूर आणि थंड डोक्याने केलेला खून असल्याचे समोर आले आहे. केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच तिच्या प्रियकर साथीदाराच्या मदतीने हा संपूर्ण कट रचल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

केतनच्या वडिलांनी नेमकी प्रतिक्रिया दिली?

केतन अग्रवाल हा १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून खाली कोसळला होता, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत बोलताना केतनचे वडील विशाल अग्रवाल  म्हणाले, “१८ जून रोजी माझा २६ वर्षांचा मुलगा केतन लोहगड किल्ल्यावरून पडला आणि आम्हाला सोडून गेला. सुरुवातीला त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने सांगितलेल्या कथेवर विश्वास ठेवून आम्हालाही हा एक दुर्दैवी अपघातच वाटला होता. मात्र, त्यानंतर तिची बदलती वक्तव्ये आणि संशयास्पद वागण्यामुळे आमचा संशय बळावला.”

त्यांनी पुढे माहिती दिली की, पोलिसांनी सिया गोयल आणि तिच्या साथीदाराला अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागला. या दोघांनीही पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला असून, केतनची हत्या करण्यासाठी त्यांनी आधीच पूर्ण नियोजन केले होते, अशी कबुली दिली आहे.

१४ जूनचा प्लॅन फसल्यानंतर १८ जूनला केली हत्या!

या हत्येच्या कटामागील धक्कादायक क्रूरता समोर आणताना केतनच्या वडिलांनी सांगितले की, “सिया आणि तिच्या साथीदाराने केतनला संपवण्याचा पहिला प्रयत्न १४ जून रोजीच केला होता. मात्र, त्या दिवशी त्यांचा हा प्लॅन फसला. त्यानंतर त्यांनी पुन्हा प्लॅन केला आणि १८ जून रोजी ते केतनला पुन्हा लोहगड किल्ल्यावर घेऊन गेले. तिथेच त्यांनी अतिशय थंड डोक्याने या गुन्ह्याची अंमलबजावणी केली.”

“सियाच्या कुटुंबातील सदस्यही या कटात सामील…” केतनच्या वडिलांचा गंभीर आरोप

या गुन्ह्यात केवळ सिया आणि तिचा साथीदारच नव्हे, तर तिचे संपूर्ण कुटुंब सामील असल्याचा गंभीर संशय केतनच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. “माझा ठाम विश्वास आहे की सिया गोयलचे आई-वडील, भाऊ आणि तिची आत्या हे सर्वजण या कटात सामील आहेत. कारण या सर्व प्रकाराची त्यांना पहिल्यापासून पूर्ण कल्पना होती. या क्रूर आणि अमानुष गुन्ह्यात सामील असलेल्या प्रत्येक दोषीला कठोर शिक्षा व्हावी आणि माझ्या मुलाला न्याय मिळावा, एवढीच माझी प्रशासनाकडून अपेक्षा आहे,” अशी आर्त हाक केतनच्या वडिलांनी दिली आहे.

या प्रकरणाच्या पुढील तपासात आता पोलीस सियाच्या कुटुंबीयांची चौकशी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोणावळा आणि पुणे परिसरात या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.