पिंपरी: मावळातील लोहगड किल्ल्यावर मित्रांसह ट्रेकिंगसाठी आलेल्या तरुणाचा ट्रेकिंगचा आनंद घेताना छायाचित्रासाठी पोझ देताना तोल गेल्याने कड्यावरून ४५० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लग्नाची गाठ बांधण्यापूर्वीच तरूणाला मृत्यूने गाठले. या घटनेमुळे संबंधित तरुणीसह तरुणाच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना गुरुवारी ( १८ जून) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

केतन विशाल अग्रवाल (वय २६, रा. लोढा बेलमोंडो सोसायटी, गहुंजे, मावळ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी याबाबत माहिती दिली. केतन हा गुरुवारी सकाळी त्याच्या मोटारीने मित्रांसह लोहगड येथे ट्रेकिंगला आला होता. लोहगडावर ट्रेकिंगचा आनंद घेताना छायाचित्र काढण्यासाठी पोझ देताना गडावरील एका कड्यावरुन त्याचा तोल गेल्याने सुमारे ४५० फूट खोल दरीत पडून गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

केतनचे येत्या नोव्हेंबर महिन्यात लग्न होते. शुक्रवारी त्याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस आहे. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस कर्मचारी पवन कराड, जय पवार, प्रशांत तुरे, प्रणय उकिरडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी या घटनेची माहिती लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाला कळविली. घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग मित्र व वन्यजीव रक्षक मावळ यांचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले.

पथकातील आदिती गायकवाड, वैष्णवी भांगरे, सचिन गायकवाड, विशाल पिसे, सागर दळवी, कुणाल कडू, सागर कुंभार, योगेश साखरे, सपना साखरे, समीक्षा साखरे, आर्यन साखरे, स्वप्निल मोकाशी, राजेंद्र कडू, योगेश दळवी, महेश मसणे, सुनील गायकवाड यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर केतनचा मृतदेह लोहगड परिसरातील घनदाट झाडीतून मार्ग शोधत खोल दरीतून बाहेर काढला. त्यानंतर स्ट्रेचरवरून गडाच्या पायथ्याशी आणण्यात आला. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.