पुणे : केतन अगरवाल खून प्रकरणात वेगवेगळ्या दिशांनी तपास करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून आरोपी चेतन चौधरीची बुधवारी ‘गेट’ चाचणी करण्यात आली.
‘लोहगडावरील कड्यावरून केतनला दरीत कसे ढकलले, याबाबतची मााहिती घेण्यात आली आहे. पोलिस आरोपी चेतन चौधरीची चालण्याची लकब जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. लोहगडावरील पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणात चेतन घटनेच्या दिवशी दिसला होता. त्याने वेशांतर केले होते. चेतनच्या चालण्याची लकब जाणून घेण्याच्या दृष्टीने ‘गेट ॲनॅलिसिस’ चाचणी करण्यात येणार आहे,’ असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
केतन अगरवाल हत्या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याची बुधवारी सकाळी ग्रामीण पोलिसांनी पुन्हा लोहगडावर नेऊन चौकशी केली. पोलिसांनी घटनास्थळी चौधरीला नेल्यानंतर नेमकी घटना कशी घडली, याची माहिती घेतली. घटनास्थळावरील घटनेची पुनर्रचना (सीन रिक्रिएशन) करण्यात आली. लोहगडावर सुरू असलेल्या पावसात पोलिसांनी सुमारे अडीच तास चेतनची चौकशी केली.
‘सियाला यापूर्वी लोहगडावर नेण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पुनर्रचना केली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी चेतनला पुन्हा लोहगडावर नेण्यात आले. सुमारे अडीच तास त्याची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी चेतनला घेऊन घटनास्थळाची पुनर्रचना केली,’ अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांकडून आरोपींचे जबाब, न्यायवैद्यक अहवाल, साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे. लोहगडावरील चौकशीचे चित्रीकरण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
घटनेच्या आदल्या दिवशी सराव
सियाने प्रियकर चेतन चौधरीबरोबर संगनमत करून केतनला लोहगडावरून ढकलून देण्याचा कट रचला होता. घटनेच्या आदल्या दिवशी सिया आणि चेतन लुल्लानगरमधील कॅफेत भेटले होते. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लुल्लानगरमधील मोकळ्या जागेत दोघांनी चेतनला ढकलून कसे द्यायचे, याबाबतचा सराव केल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली होती.
