पुणे : लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अगरवाल खून प्रकरणात आरोपनिश्चिती लांबणीवर पडली आहे. वडगाव मावळ येथील न्यायालयात शनिवारी सुनावणी झाली. न्यायालयाच्या आदेशाने आरोपनिश्चितीची प्रक्रिया १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
केतन अगरवाल याचा लोहगड किल्ल्यावरील दरीत ढकलून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी केतनची नियोजित पत्नी सिया गोयल, तिचा प्रियकर चेतन चौधरी, त्याचा मित्र रितेश हांगे यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी पाच हजार पानी आरोपपत्र दाखल केले. वडगाव मावळ येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी. के. अनुभुले यांच्या न्यायालयात शनिवारी सुनावणी पार पडली.
डिजिटल साक्षी, तसेच पुरावे, खटल्याशी संबंधित कागदपत्रांच्या उपलब्धतेवरून आरोपींच्या वकिलांनी मुद्दे उपस्थित केल्याने आरोपनिश्चिती पुढे ढकलण्यात आली. मुख्य आरोपी सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांना दूरदृश्य संवाद सुविधेद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) हजर करण्यात आले.
सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. सिया गोयलच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग आणि ॲड. एन. एम. भालेराव, तर चेतन चौधरीच्या वतीने ॲड. हर्षद निंबाळकर आणि ॲड. जयराज जगताप यांनी काम पाहिले. तिसरा आरोपी रितेश हांगे याने अद्याप वकील नियुक्त केला नसल्याने न्यायालयाकडे मुदत मागितली. पुढील तारखेपर्यंत त्याने वकील नियुक्त न केल्यास विधी सेवा समितीकडून त्याला वकील उपलब्ध करून दिला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
बचाव पक्षाच्या वकिलांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांनी संबंधित साक्षी, तसेच पुरावे पोर्टलवर असून, ते पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचा मुद्दा मांडला.
‘सरकार पक्षाकडे भक्कम पुरावे’
‘पुढील तारखेला आरोपनिश्चितीची प्रक्रिया होईल. सरकार पक्षाची भिस्त कागदपत्रांवर असून, सरकार पक्षाकडे कोणते पुरावे आहेत, याची माहिती न्यायालयात मांडणार आहोत. आरोपींच्या चेहऱ्यावर दुःख किंवा पश्चात्तापाचा लवलेश दिसत नाही,’ असे ॲड. उज्ज्वल निकम यांनी सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
