पुणे : केतन अगरवाल हत्या प्रकरणात केतनची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना रविवारी सकाळी लोहगडावर नेले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी घडलेल्या घटनेची पुनर्रचना (सीन रिक्रएशन) केली.
‘केतन अगरवाल हत्या प्रकरणात त्याची नियोजित पत्नी सिया आणि चेतन यांनी समाज माध्यमांवर माहिती शोधल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सिया केतनला घेऊन १४ जूनला लोहगडावर गेली असताना, तिने केतनला दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यामुळे तिने चेतनची मदत घेतली,’ अशी माहिती तपासात मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरोपी चेतन आणि सिया वडगाव मावळ न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सध्या पोलीस कोठडीत आहेत. दोघांना सोमवारपर्यंत (२९ जून) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरोपी सिया गोयलच्या आई-वडिलांची शनिवारी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चौकशी केली. सियाच्या भावाची शुक्रवारीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या आई-वडिलांची शनिवारी चौकशी करण्यात आली.
त्यानंतर रविवारी सकाळी सिया आणि चेतनला घेऊन पोलिसांचे पथक लोहगडावर गेले. घटनास्थळाची पाहणी पोलिसांनी केली. दोघांची घटनास्थळी चौकशी करण्यात आली. घटना नेमकी कशी घडली; तसेच घटनाक्रम काय होता, याची माहिती पोलिसांनी घेतली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
केतन याचा सिया आणि चेतन यांनी १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून खून केला. याप्रकरणी अगरवाल कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर पाेलिसांनी तपास करून खुनाचा छडा लावला. पोलिसांना संशय येऊ नये याची दोघांनी काळजी घेतली होती.
