पुणे : केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी चेतनच्या वर्गमित्राची चौकशी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात आता तपास अधिक खोलवर जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण मूळचा बीडमधील असून, सध्या तो बालेवाडी भागात राहायला आहे. केतन अगरवाल खून प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीने या मित्राला कथितरीत्या खुनाच्या कटाची माहिती दिली होती. त्याला लोहगडावरही येण्यास सांगितले होते. मात्र, तरुणाने त्याला नकार दिला.
उलट, मित्राने त्याला खून न करण्याचा सल्ला दिला. ‘अशा प्रकारचे कृत्य महागात पडेल,’ असे मित्राने चेतनला सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चैाधरी यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. केतन अगरवाल हत्या प्रकरणात अटकेत असलेले सिया आणि केतनच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्यानंतर दोघांना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले.
‘सिया आणि चेतन हे सांकेतिक भाषेत संवाद साधायचे. त्यांनी समाज माध्यमातील संवाद काढून टाकला आहे. हा संवाद पुन्हा मिळवण्यासाठी तांत्रिक तपास करायचा आहे. त्या अनुषंगाने दोघांची समाेरासमोर चौकशी करायची आहे. तपासासाठी दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ करावी,’ अशी विनंती तपास अधिकारी मनोज पवार यांनी न्यायालयात केली.
या प्रकरणात सियाकडून मोबाइल संच जप्त करण्यात आला नाही. सिया तपासात सहकार्य करत असून, पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे बचाव पक्षाचे वकील विपुल दुशिंग यांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पोलीस कोठडी देण्याची विनंती अमान्य करण्यात आली. सिया आणि चेतनला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.
‘केतन अगरवाल हत्या प्रकरणात साक्षीदार समोर आले आहेत. त्यांचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकरणात कोणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. तपासाच्या अनुषंगाने केतन आणि आरोपीशी संबंधित प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे,’ असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.
‘नार्को’ चाचणी नाही
‘नार्को चाचणीला आरोपींची परवानगी लागते. आरोपी सिया आणि चेतन यांनी नार्को चाचणीला संमती दिली नाही. त्यामुळे दोघांच्या नार्को चाचणीस परवानगी देण्यात येत नाही,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. सरकार पक्षाने आरोपींच्या नार्को चाचणीची गरज नसल्याचे नमूद केले.
