पुणे : पारंपरिक ‘पोलिसी खाक्या’चा अवलंब न करता मानस अभ्यास पद्धतीने चौकशी करून पुणे ग्रामीण पोलिसांनी केतन अगरवाल खून प्रकरणाचा उलगडा केला. आरोपींच्या वर्तनाचा अभ्यास, त्यांच्या प्रतिक्रियांचे निरीक्षण आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करून प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे या चौकशीदरम्यान दोन्ही आरोपी हळूहळू बोलते झाले आणि नियोजनबद्ध हत्येचा कट उघडकीस आला, असे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी काढताना दरीत पडून केतन अगरवालचा मृत्यू झाल्याची ‘कथा’ त्याची वाग्दत्त वधू सिया गोयल हिने रचली होती. मात्र, घटनास्थळाची पाहणी करताना तेथून अपघाती मृत्यू होणे शक्य नसल्याचे ग्रामीण पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या तपासणीमध्ये तब्बल ३३ अंश सेल्सिअस तापमानात हुडी घालून फिरणारा एक तरुण दिसून आला. त्याचा माग काढल्यानंतर तो चेतन चौधरी असल्याचे निष्पन्न झाले आणि तपासाला निर्णायक दिशा मिळाली. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
१८ जून रोजी घटना घडल्यानंतर सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती पाहता, घसरून पडण्याची शक्यता नसल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे मृत्यूबाबत संशय निर्माण झाला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
केतनच्या कुटुंबीयांशी संवाद साधला असता, ६ जून रोजी बालीला जाताना त्याचे पारपत्र हरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आणि मृत्यूमागे वेगळे कारण असू शकते, असा निष्कर्ष त्यांनी काढला. भारतीय पुरातत्त्व विभागाने लोहगड किल्ल्यावर बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणामध्ये दिसलेल्या हुडीधारी तरुणाच्या हालचालींचा माग चेतन चौधरी याच्यापाशी येऊन थांबला. त्यानुसार, २३ जून रोजी चेतन चौधरीला अटक करण्यात आली, तर २४ जून रोजी सिया गोयलला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींना स्वतंत्रपणे प्रश्न विचारण्यात आले. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या चौकशीतही त्यांच्या उत्तरांमध्ये जवळपास एकसारखेपणा आढळला. त्यामुळे त्यांनी आधीच बचावाची तयारी करून ठेवली असल्याचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी त्यानंतर मानसशास्त्रीय पद्धतीने चौकशीचा वेग वाढवला. आरोपींचे हावभाव, बोलण्याची शैली आणि मानसिक प्रतिक्रियांचा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नांमुळे दोघांचाही बनाव कोसळला. आरोपींनी हत्या कथितपणे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे तपासात स्पष्ट झाले. पकडले गेल्यास कोणती उत्तरे द्यायची, चौकशीला कसे सामोरे जायचे आणि अपघाती मृत्यूचा बनाव कसा उभा करायचा, याचाही आरोपींनी आधीच विचार केला होता. केतनच्या हत्येची माहिती कोणालाही कळू नये आणि गुन्ह्यात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग राहू नये, यासाठी सुपारी न देता स्वतःच हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सियासमवेत पोलीस लुल्लानगर येथील कॅफेमध्ये
केतन अगरवाल याचा दरीत ढकलून खून करण्यापूर्वी आदल्या दिवशी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी कथितपणे लुल्लानगरमधील कॅफेमध्ये कट रचला होता. त्याची माहिती घेण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी काल सकाळी सिया गोयल हिला लुल्लानगरमधील कॅफेमध्ये आणले. सिया आणि चेतनने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लुल्लानगरमधील मोकळ्या जागेत दोन वेळा सराव केला होता, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. तसेच, या कॅफेचे व्हिडिओही प्रसारित झाले होते. केतन याला गड-किल्ल्यांवर फिरण्याचा छंद होता. त्यामुळे आरोपींनी त्याला मारण्यासाठी लोहगड किल्ल्याची निवड केली होती़.
लोणावळा ग्रामीण पोलिसांचे पथक काल सकाळी सियाला घेऊन कॅफेमध्ये आले. सिया, चेतन कोठे बसले होते, इथे किती वेळ होते, या वेळी ते कोणाशी काही बोलले का, अशी सर्व माहिती पोलिसांनी तिच्याकडून घेऊन पडताळून पाहिली. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांना आज (३ जुलै) न्यायालयात हजर करावे लागणार आहे. आवश्यक ती माहिती, पुरावे गोळा करण्याच्या उद्देशातून पोलिसांनी सियाला कॅफेत आणले होते, असे सूत्रांनी नमूद केले.
…
