पुणे : ‘केतन अगरवाल याची हत्या करण्याचा कट नियोजित पत्नी सिया गोयल, तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी रचला होता. सिया आणि चेतनने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लुल्लानगरमधील मोकळ्या जागेत दोन वेळा सराव केला होता,’ अशी माहिती पोलिस तपासात मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन हे केतनच्या खुनाच्या आदल्या दिवशी लुल्लानगरमधील एका कॅफेत भेटले होते. दोघांनी त्याला मारण्याचा कट रचला. लुल्लानगरमध्ये मोकळी जागा आहे. तेथे सिया आणि चेतनने केतनला लोहगडावरून दरीत ढकलून कसे द्यायचे, याबाबतचा सराव केला.
केतन याला गड-किल्ल्यांवर फिरण्याचा छंद होता. त्यामुळे आरोपींनी त्याला मारण्यासाठी लोहगड किल्ल्याची निवड केली. मे महिन्यात पहिल्यांदा केतन सियाला घेऊन लोहगडावर गेला होता. केतनबरोबरचा विवाह मान्य नसल्याचे तिने प्रियकर चेतनला सांगितले होते. लोहगडावरील दरीत चेतनला ढकलून देण्याचा कट सियाने प्रियकराच्या मदतीने रचला. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सिया आणि चेतन यांनी लुल्लानगरमधील परिसरात केतनला लाेहगडावरून कसे ढकलून द्यायचे, याबाबतचा सराव केल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसंचे पथक या प्रकरणाचा तपास करीत आहे.
सियाच्या भावाला मानहानीची नोटीस
केतन अगरवाल खून प्रकरणात अटकेत असलेल्या सिया गोयलचा भाऊ साहिल याला ॲड. आशुतोष श्रीवास्तव यांनी दहा कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. ‘साहिल गोयल याने माझ्यावर खोटे आरोप केले. माझी बदनामी केली. त्यामुळे माझ्या व्यावसायिक प्रतिष्ठेचे नुकसान झाले आहे,’ असे ॲड. श्रीवास्तव यांनी नोटिशीत म्हटले आहे. ‘माझ्यावर केलेले आरोप मागे घ्या. माझी जाहीर माफी मागा. भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करू नका. या बाबतची लेखी हमी द्या,’ असेही नमूद केले आहे.
‘आशुतोष श्रीवास्तव आमचे वकील नाहीत. आम्ही त्यांची सेवा घेतली नाही, तसेच त्यांच्याशी चर्चा केली नाही. त्यांनी पोलीस कोठडीत सिया गोयलची कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली. विपुल दुशिंग आमचे वकील आहेत. याबाबत आम्ही न्यायालयात शपथपत्र दाखल केले होते,’ असे सिया गोयलचा भाऊ साहिल याने नुकतेच सांगितले होते. त्यानंतर ॲड. श्रीवास्तव यांनी साहिल गोयल याला दहा कोटी रुपयांची मानहानीची नोटीस बजावली आहे.
