पुणे : लोहगडावरुन दरीत ढकलून देण्यापूर्वी केतन अगरवाल याला कशा पद्धतीने मारायचे, याबाबतचा सराव केतनची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केला होता. केतनचा खून कशा पद्धतीने करता येईल, याबाबतची माहिती दोघांना समाज माध्यमातून घेतली होती. लोहगडावरील जागा सिया आणि चेतनने निश्चित केल्यानंतर १४ जून रोजी कड्यावरुन ढकलून देऊन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर वाढदिवस साजरा करण्याची बतावणी करुन सियाने १८ जून रोजी केतनला पुन्हा लोहगडावरुन नेऊन प्रियकराच्या मदतीने ढकलून दिल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.

केतन आणि त्याची सिया हे १८ जून रोजी लोहगडावर गेले होते. त्यांच्या पाठाेपाठ आरोपी चेतन तेथे पोहोचला होता. गडाच्या पायथ्याशी असलेल्या सुरक्षारक्षकांकडून २५ रुपये प्रवेशशुल्क आकारण्यात येते. चेतनने हे प्रवेशशुल्क चुकवले होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेत येऊ नये म्हणून त्याने ‘हुडी’ परिधान केली. चेहरा झाकला होता. वेशांतर करुन तो गडावर पोहोचला होता. सकाळी दहा ते पावणेअकराच्या सुमारास लोहगडावरील हत्ती तलावाच्या बाजूस असलेल्या दरीत सिया आणि चेतनने केतनला ढकलून दिले. त्यानंतर केतन तोल जाऊन पडल्याचा कांगावा सियाने केला. याबाबतची माहिती गडावरील नागरिक, तसेच सुरक्षारक्षकांना दिली. याबाबतची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले. केतनला दरीतून काढण्यात आले. खंडाळ्यातील जिल्हा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

केतनच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या अकस्मात मृत्यूबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला. त्यानंतर सियाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा तिने प्रियकराच्या मदतीने केतनला कड्यावरुन ढकलून देऊन खून केल्याची कबुली दिली. केतन आवडत नसल्याने त्याचा खून केला. टक्कल असल्याने त्याने टोप (विग) परिधान केला होता. तो अडखळत बोलत होता. त्यामुळे तो आवडत नसल्याचे सियाने पोलिसांना सांगितले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

दिवाळीनिमित्त मार्केट यार्ड भागात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चेतन आणि सिया यांची ओळख झाली होती. मार्केट यार्डात क्रिकेटचे सामने खेळविण्यात आले होते. दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, सियाच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली होती. केतन याचे वडील विशाल यांच्या नात्यातील एकाने सियाचे स्थळ सुचविले होते. त्यानंतर त्यांचा विवाह निश्चित झाला. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर काही दिवस सिया आणि चेतन यांच्यात दूरावा निर्माण झाला. मात्र, सियाला केतनसोबत होणारा विवाह मान्य नव्हता. तिने कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिचे धाडस झाले नाही. त्यानंतर तिने पुन्हा चेतनशी बोलण्यास सुरुवात केली. केतनचा खून करण्याचा कट रचण्यात आला. समाज माध्यमातील चित्रफीत पाहून खून कशा पद्धतीने करता येईल, याबाबतची माहिती घेतली. १४ जूनपूर्वी चेतन आणि सिया हे भेटले होते. सिया आणि केतन हे लोहगडावर यापूर्वी जाऊन आले होते. केतनला दरीत ढकलून देऊन खून करण्याचा कट रचण्यात आला. त्यानंतर सिया आणि चेतनने सराव केला. लोहगडावरील हत्ती तलावाजवळ असलेली जागा निवडण्यात आली होती.

पहिला प्रयत्न फसल्यानंतर चेतनची मदत

१४ जून रोजी सिया केतनला घेऊन लोहगडावर गेली होती. त्या वेळी तिने केतनला दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सियाचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्या वेळी ती ‘साप साप’ म्हणून ओरडली होती. हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिने चेतनची मदत घेतली, अशी माहिती तपासात मिळाली आहे. आरोपी चेतन आणि सिया यांना वडगाव मावळ न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याच आदेश दिले आहेत. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.