पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी प्रकल्पातील जोरदार पावसामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरल्यामुळे जलसंपदा विभागाकडून धरणातून मंगळवारी मध्यरात्रीपासून विसर्ग सुरू करण्यात आला. बुधवारी दुपारपर्यंत विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आल्यामुळे मुठा नदीला पूर आला आणि नदीकाठलगतच्या रहिवासी भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. पुरामुळे भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली. रात्री आठ वाजता विसर्ग कमी करण्यात आला.

दरम्यान, खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये मिळून १४.९५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा झाला. गेल्या काही दिवसांपासून पाणीकपातीला तोंड देणाऱ्या पुणेकरांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरण साखळी प्रकल्पात जोरदार पाऊस झाला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर येवा येत असल्यामुळे खडकवासला धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सांडव्यावरून मुठा नदीपात्रात मंगळवारी (७ जुलै) ८०८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. मात्र, पावसाचा जोर वाढल्यामुळे मध्यरात्रीपासून विसर्गात वाढ करण्यात आली. मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता ८४२, एक वाजता १ हजार ६८४, दीड वाजता ३ हजार ४२४, अडीच वाजता ६ हजार ६३४ क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पहाटे सव्वातीन वाजल्यापासून विसर्गात वाढ करण्यात आली.

सव्वातीन वाजता १४ हजार ३९३ क्युसेकचा असलेला विसर्ग पहाटे साडेपाच वाजता २७ हजार २०३ क्युसेक करण्यात आला. त्यामुळे नदीला पुराचे स्वरूप आले. नदीकाठालगतच्या अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता विसर्ग १८ हजार २७१ क्युसेक असा करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी आठ वाजता १५ हजार १५७ क्युसेग वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणात १२, पानशेत येथे ५०, वरसगाव येथे ४७ आणि टेमघर येथे ६६ मिलिमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली. आतापर्यंत खडकवासल्यात ४१७, पानशेत येथे ९७२, वरसगाव येथे ९४७ तर, टेमघर येथे १ हजार १४५ मिलिमिटर पाऊस झाल्याचे सांगण्यात आले.

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा (बुधवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत) नाव पाऊस टीएमसी टक्के

खडकवासला १२ मिमी १.८३ ९२.६१
पानशेत ५० मिमी ५.६५ ५३.०४
वरसगाव ४७ मिमी ६.२६ ४८.८२
टेमघर ६६ मिमी १.२२ ३२.८२

तीन धरणे काठोकाठ

भीमा खोऱ्याअंतर्गत जिल्ह्यातील २७ धरणांपैकी खडकवासल्यासह वडज, कळमोडी आणि कासारसाई ही धरणे शंभर टक्के भरल्यामुळे विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच, बारा धरणे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत. त्यामध्ये येडगाव, चिल्हेवाडी, चासकमान, भामा-आसखेड, वडीवळे, आंद्रा, पवना, मुळशी, गुंजवणी, नीरा-देवधर, भाटघर, वीर या धरणांचा समावेश आहे. वडज धरणातून १४ हजार क्युसेक, चिल्हेवाडी धरणातून ३ हजार १३, कळमोडीतून ५ हजार ४५९, वडिवळे धरणातून १ हजार १२३, कासारसाई धरणातून ३ हजार २७ क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.