पुणे : ‘जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणाच्या कालव्यातून सुरू असलेले रब्बी हंगामासाठीचे आवर्तन येत्या १५ नोव्हेंबर रोजी बंद करण्यात येणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्या संदर्भातील निर्णय घेण्यात आला असून, आवर्तन बंद होण्याच्या कालावधीपर्यंत कालव्यातून साडेचार टीएमसी पाणी सिंचनासाठी देण्यात येण्यात येणार आहे. आवर्तन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सव्वातीन टीएमसी पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, धरणातील मर्यादित पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळी आवर्तनही रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र, त्या संदर्भातील निर्णय राज्य पातळीवर होईल,’ असेही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

रब्बी हंगामासाठी साधारपणे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापासून कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र, यंदा ‘एल-निनो’चा प्रभावामुळे पावसात खंड पडल्यामुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी २५ सप्टेंबरपासून खडकवासला धरणाच्या मुठा उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू करण्यात आले. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या सहमतीने जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला होता. सध्या आवर्तन सुरू असून, आतापर्यंत सव्वातीन टीएमसी पाणी कालव्यातून हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यासाठी देण्यात आले आहे. मात्र, धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता पाणी काटकसीरीने वापरण्याची आवश्यकता असल्यामुळे सिंचनाच्या पाण्यातही काटकसर करावी लागणार आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबर रोजी कालवा आवर्तन बंद करण्यात येणार आहे. कालव्यातून जवळपास ५१ दिवस पाणी सोडण्यात आल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. साधारणपणे कालवा आवर्तन ४५ दिवसांचे असते.

रब्बीचे आवर्तन पूर्ण केल्यानंतर उन्हाळ्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने आवर्तन रद्द करण्याचेही विचाराधीन आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील सिंचनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. मात्र, त्या बाबतचा निर्णय जानेवारी महिन्यात होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात तूर्त २४.०८ टीएमसी एवढा पाणीसाटा आहे. यापूर्वी पालखीसाठी ७ ते १५ जुलै या कालावधीत पहिले आवर्तन देण्यात आले होते. त्यानंतर १६ जुलै ते २४ सप्टेंबर या काळात खरीप हंगाम आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू ठेवण्यात आले. या आवर्तनात एकूण ६.३८ टीएमसी पाण्याचा वापर झाला. त्यासाठी ओव्हरफ्लोचे पाणी आणि धरणातील साठ्याचा वापर करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.