पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे धरणातील पाण्याचा साठा वाढला आहे. खडकवासला धरण ९४ टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने मंगळवारी मध्यरात्रीपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीच्या काळात साडेआठशे क्युसेस, त्यानंतर १७००, ३५००, ६५००, १४५०० आणि त्यानंतर २७ हजार २०३ क्युसेस पाणी धरणातून सोडले जात आहे. पावसाची परिस्थिती पाहून पाणी सोडण्याचे प्रमाण वाढविले जाईल, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरते. धरणातून पाणी सोडल्याने निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी बुधवारी पहाटे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर व विठ्ठल नगर या संभाव्य बाधित परिसरांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

महापौर नागपुरे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

या प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनामार्फत आवश्यक सूचना देण्यात आल्या. नदीपात्रालगत तसेच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि आवश्यकता भासल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केले.

महापौर म्हणाल्या, “पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असून आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाईल.”

या पाहणी दरम्यान स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यांच्या सूचनांची दखल घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी

खडकवासला धरणातून पाणी सोडले जात आहे. टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ होत असल्याने सिंहगड रस्त्यावरील नदीकाठी असलेल्या इमारतींच्या पार्किंग मध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. या भागातील द्वारका, जलपूजन या इमारतीचा पार्किंग मध्ये पाणी शिरले आहे. धरणातील विसर्ग वाढेल त्याप्रमाणे सोसायटीमध्ये पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या भिडे पूल नदीपात्रातील रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे.