पुणे : शहराच्या सर्वच भागात गेल्या २४ तासांपेक्षा अधिक काळ पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक भागांत पावसाळी गटारांचे तसेच ड्रेनेजचे पाणी साचणे, झाडांच्या फांद्या पडणे, पूरस्थिती निर्माण झाली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीतील खडकवासला परिसरात सर्वाधिक ११५.२० मिमी पावसाची नोंद झाली असून कोंढवा-येवलेवाडी भागात ७७.२० मिमी, वानवडी-रामटेकडी (७३ मिमी), नगररोड-वडगाव शेरी (७६ मिमी) आणि होळकर पाटील रस्ता (६१ मिमी) इतक्या पावसाची नोंद झाली.
सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागात पुराचे पाणी शिरले असून आवश्यक ती काळजी घेण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. अचानकपणे सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पोराचा धोका निर्माण झाला असून सुरक्षिततेच्या कारणास्तव सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे. आत्तापर्यंत महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागांमधून २६० कुटुंबातील तब्बल १०४० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
पुराचे पाणी घुसलेल्या वस्त्यांमधील नागरिकांचे स्थलांतर केले जात आहे. यामध्ये येरवडा, वडगाव शेरी, घोरपडी, बोपोडी आणि शिवाजीनगर परिसरातील पुरग्रस्त नागरिकांना महानगरपालिकेने शाळा व समाजमंदिरांमध्ये तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला आहे. शहरात पावसाला सुरुवात झाल्यापासून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ६३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये २१ ठिकाणी पाणी साचल्याच्या, १८ ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडल्याच्या तसेच भिंत कोसळण्याच्या चार घटना नोंदविण्यात आल्या. सोमवार पहाटे पेठ-धनगर गल्ली तसेच अशोक चौक-नाना पेठ येथे वाडा पडल्याच्या घटनाही घडल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत
शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत ठेवला असून सर्व क्षेत्रीय कार्यालये, अग्निशमन दल, जलनिस्सारण, पथ, विद्युत व इतर विभागांमध्ये समन्वय साधून तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात येत आहे.महापालिकेने ४९ ठिकाणी मदत केंद्रे उभारली आहेत. यासाठी हजारो कर्मचारी, जेसीबी, पंप, कॉम्पॅक्टर, टिपर, बिन लिफ्टर, फॉगिंग मशीन, पाण्याचे टँकर आदी यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.
अडचण आल्यास येथे करा संपर्क
पुणे महानगरपालिका, हवामान विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. नदी, नाले, ओढे, पूल, सखल भाग तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे टाळावे. झाडाखाली अथवा धोकादायक ठिकाणी उभे राहू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने आपत्कालीन संपर्क क्रमांक (२४x७) :आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष : ०२०-२५५०१२६९ / ०२०-२५५०६८००
गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी : ९६८९९३१५११ तसेच केदार वझे, उप अभियंता : ९६८९९३१२८७, प्रकाश कोतवाल, शाखा अभियंता : ९८५०९२०७१४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
