पुणे : खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत शहरातून वाहणारा मुठा उजवा कालवा रद्द करून भूमिगत २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा अहवाल जलसंपदा विभागाकडून राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे (स्टेट लेव्हल टेक्निकल ॲडव्हायजरी कमिटी -एसएलटीए) पाठविण्यात आला आहे. या समितीकडून अहवालाची तांत्रिक छाननी सुरू करण्यात आली असून, समितीकडून प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत मुठा उजवा कालवा २८ कि.मी. लांबीचा आहे. कालव्याच्या पाण्याची चोरी, गळती, बाष्पीभवन होते. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. या पार्श्वभूमीवर धरणपासून फुरसुंगीपर्यंतचा कालवा रद्द करून त्याऐवजी भूमिगत बोगदा करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढून काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल तांत्रिक मान्यतेसाठी सध्या जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे सादर करण्यात आला होता. जलसंपदा विभागाकडून त्याची छाननी पूर्ण करून हा अहवाल तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे. या समितीने प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर राज्य शासनाची परवानगी घेऊन प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

हेही वाचा – कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांसाठी आणलेल्या २४५ मतदार यंत्रांमध्ये बिघाड, मतदान यंत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परत

प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे अडीच अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच शहराला दोन महिने पुरेल एवढे पाणी वाचणार आहे. तसेच पाणी गळती कमी होऊन शेतीला देखील पाणी मिळण्यास मदत होणार आहे. ७.८० मीटर रूंद, ३.९० मीटर उंच आणि १.९५० मीटर गोलाकार उंची अशा इंग्रजी-डी आकाराच्या बोगद्यातून खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे जलसंपदा विभागाकडून प्रस्तावित आहे. या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्यूसेक होणार असून ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेता येणार आहे. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.

खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर तो राज्य सरकारकडे प्रशासकीय मान्यतेसाठी जाणार आहे. त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह.वि. गुणाले म्हणाले.

हेही वाचा – पुणे-सोलापूर महामार्गावर बसची ट्रकला धडक; पोलीस कर्मचाऱ्यासह चार जण ठार, १५ जखमी

कालव्याच्या जागेचा व्यावसायिक वापर शक्य

खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर असलेल्या कालव्याच्या जागेचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी करता येणे शक्य आहे. सध्या ही जागा ५०० मीटर ते एक किलोमीटर या रुंदीची आहे. त्यातील काही भाग महापालिका आणि पीएमआरडीए हद्दीत येतो. त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जागा कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करावी, याचा निर्णय राज्य सरकारच घेणार आहे. तसेच यातून जलसंपदा विभागाला अतिरिक्त हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर) मिळेल किंवा कसे, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khadakwasla to fursungi underground tunnel will be made or not pune print news psg 17 ssb
First published on: 01-02-2023 at 11:42 IST