कार्ला येथे एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या कोळी बांधवांवर सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास काळाने घाला घातला. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर खालापूरजवळ माडप बोगद्यालगत भाविकांचा टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार, तर वीस जण जखमी झाले. भरधाव टेम्पो रस्त्याच्या सुरक्षा कठडय़ाला धडकल्याने पलटी झाला होता. अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गीकेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
विशाल भगवा चमार (वय २६), शैला कैलास बंगाली (वय ३२), हैसा भगवा चमार (वय ४५), गवा वैती (वय ४०), दत्ता वैती (वय ३५) व धीरज पाटील (वय ३०, सर्व रा. अंधेरी, वर्सोवा) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्सोवा येथील कोळी बांधव वेसावा मच्छिमार सहकारी सोसायटीच्या टेम्पोतून कार्ला येथे रविवारी एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर रात्रीचे जेवण करून सर्व मंडळी पुन्हा मुंबईकडे निघाली होती. रात्रीच्या वेळी द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या कमी असल्याने टेम्पो भरधाव निघाला होता.
पहाटे दोनच्या सुमारास टेम्पो माडप बोगद्याजवळ आला. बोगदा पार केल्यानंतर चालकाचे टेम्पोवरी नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी सुरक्षा कठडय़ावर आदळला. त्यानंतर विजेच्या खांबाला धडकून टेम्पो पलटी झाला. टेम्पोचा वेग खूप असल्याने त्याच्या धडकेने मजबूत लोखंडी कठडाही तुटला. त्यामुळेच सहा जणांचे प्राण केले व वीस जणांना गंभीर इजा झाल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पनवेल येथील पॅनासिया, अष्टविनायक व एमएजीएम रुग्णालय येथे जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.