पुणे : राजगड तालुक्यातील खानापूर-पानशेत मार्गावरील पानशेत वसाहतीजवळील मोठा पूल संरचनात्मकदृष्ट्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने तो सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गजानन पाटील यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत.

हा पूल ६८ वर्षांहून अधिक जुना असून, विशेष तांत्रिक परीक्षणात त्याची स्थिती अत्यंत कमकुवत असल्याचे आढळून आले आहे. आगामी मान्सून काळात मुठा नदीच्या विसर्गामुळे दुर्घटना आणि जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

लवासा, वरसगाव तसेच आसपासच्या भागातून पानशेतकडे जाणारी वाहतूक निळकंठेश्वर रस्ता,डवजे, कोंढूर, बहुली,कातवडी, मांडवी-कुडजे खडकवासला धरणमार्गे गोऱ्हे,खानापूर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच पानशेत आणि वरसगाव धरण परिसरातून पुण्याकडे येणारी वाहतूक कुरण खुर्द, राणवडी, सोनपूर,ओसाडे, खानापूर,गोऱ्हे,खडकवासला धरणमार्गे कुडजे, मांडवी, कातवडी,बहुली,कोंढूर,डवजे अशी वळविण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे. दरम्यान, हवेली तालुक्यातील कातवडी-कांदूर-निळकंठेश्वर मार्गावरील मुठा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने तो कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.

पूल बंद झाल्यामुळे कातवडीकडून डावजे कुरणकडे जाणारी वाहतूक कातवडी,बहुली,कोंढूर,डावजे,जांभळी-कुरण या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच कुरण-डावजे बाजूकडून कातवडीकडे येणारी वाहतूक कुरण–जांभळी,डावजे, कोंढूर,बहुली आणि कातवडी मार्गे वळविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशानसाकडून देण्यात आली. वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी मजबूत बॅरिकेडिंग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या आदेशामुळे परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांद्वारे सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे.