पुणे : महात्मा जोतिबा फुले यांचे मूळ गाव असलेल्या खानवडी येथे ‘जोती-सावित्री जिल्हा परिषद शाळा’ उभारण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ‘सीबीएसई’शी संलग्न असलेली पुणे जिल्हा परिषदेची ही पहिली शाळा ठरणार आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) चालविण्यात येणारीही ही राज्यातील पहिली शाळा असून, या शाळेच्या माध्यमातून गरीब, गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महात्मा फुले यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी वर्षाच्या औचित्याने या शाळेचे उद्घाटन शनिवारी (११ एप्रिल) सकाळी दहा वाजता मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह विविध मंत्री, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

शाळा चालवण्यासाठी क्रिस्टल हाउस इंडिया या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीनेच पुणे शहर, जिल्ह्यातील पात्र शिक्षकांची निवड केली असून, शाळेवर जिल्हा परिषदेचे प्रशासकीय नियंत्रण राहील. तसेच, मान्यवर तज्ज्ञांचा समावेश असलेली नियामक समितीही नियुक्त केली जाईल.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील या वेळी उपस्थित होते.

खानवडी येथील १२ एकर जमीन राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने निवासी आणि अनिवासी स्वरूपाची शाळा चालवण्यास मान्यता दिली. येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळेचे कामकाज सुरू होईल. बालवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतच्या वर्गासाठी २६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, तर पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीपासून निवासी शाळा सुरू केली जाणार आहे. त्यात ४० विद्यार्थ्यांना निवासी सुविधा देण्यात येणार आहे.

‘बालवाडी ते बारावीपर्यंतचे वर्ग शाळेत असणार आहेत. सुमारे दोन हजार विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊ शकणार आहेत,’ असे पाटील यांनी नमूद केले. या प्रकल्पासाठी फियाट इंडिया कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत २१ कोटी रुपये, तर जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद सेस निधीद्वारे १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. वर्गखोल्यांसह अन्य सुविधांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे, तर वसतिगृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.

‘शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक समता, सक्षमीकरण, ग्रामीण विकास साध्य करण्याचा व्यापक प्रयत्न आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आधुनिक काळात प्रभावी अंमलबजावणी करणारा हा उपक्रम येत्या काळात राज्यात आदर्श ठरेल,’ असे जगदाळे यांनी सांगितले.

या शाळेत डिजिटल शिक्षणासह प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना न्याहरी, भोजन, गणवेश, कपडे, वाहतूक व्यवस्था पुरवली जाणार आहे. खानवडी परिसरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. – गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद