पुणे : खराडी, मुंढवा-केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुळा-मुठा नदीवर उभारण्यात आलेल्या खराडी-केशवनगर पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले आहे. केवळ केशवनगरकडील ७०० मीटर जोडरस्त्याचे काम शिल्लक आहे. हे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करुन हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिले.

खराडी, मुंढवा, केशवनगर, मगरपट्टा, हडपसर, वाघोली आणि वडगाव शेरी परिसरात आयटी कंपन्या, व्यावसायिक संकुले, शैक्षणिक संस्था आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे या परिसरात दररोज वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने तीन वर्षांपूर्वी मुळा-मुठा नदीवर नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. पथ विभागाच्या माध्यमातून २३ कोटी २० लाख रुपयांच्या खर्चातून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या पुलाचे काम केले जात होते.

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकल्पातील पुलाचे मुख्य काम पूर्ण झाले आहे. खराडीकडील बाजूने सिग्नलसह वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. मात्र, केशवनगरकडील रेणुकामाता मंदिर परिसरातून गोदरेजकडे जाणाऱ्या सुमारे ७०० मीटर जोडरस्त्याचे काम अद्याप सुरू असल्याने पूल वाहतुकीसाठी खुला करता आलेला नाही. पाऊस सुरु झाल्याने डांबरीकरणाच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश भिमाले यांनी दिले.

पावसाळ्यामुळे डांबरीकरणाच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याशिवाय या रस्त्यासाठी आवश्यक असलेली सुमारे २५० मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्याचे कामही सध्या सुरू आहे. केशवनगरकडील सुमारे ७०० मीटर लांबीच्या जोडरस्त्याचे काम पूर्ण होताच पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, या फुलाच्या मार्गात अडथळा ठरणारी काही झाडे आहेत. ही झाडे काढण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या पुलाच्या कामात अडथळा ठरणारी झाडे काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या पदपथ आणि डांबरीकरणाची कामे सुरू असून १५ ऑगस्टपर्यंत ती पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा पूल सुरू झाल्यानंतर या भागात होत असलेली वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. परिणामी येथील आयटी कंपनीमध्ये कामाला असलेलं असंख्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

अशी आहेत पुलाची वैशिष्ट्ये…

  • प्रकल्प खर्च : २३ कोटी २० लाख रुपये
  • पुलाची लांबी : २४६.४० मीटर
  • पुलाची रुंदी : २४ मीटर
  • दोन्ही बाजूंना १ मीटर रुंदीचे स्वतंत्र सेवा मार्ग
  • २ मीटर रुंदीचा स्वतंत्र पदपथ
  • दुभाजकाची रुंदी : १ मीटर