पुणे : राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे पेरणीचा टक्का वाढला आहे. ३० जुलैअखेर राज्यात खरीप पेरणी ९६.४१ टक्क्यांवर गेली आहे. मका, उडीद आणि सोयाबीनचा उच्चांकी पेरा झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. त्यांपैकी १,३६,९२,८४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पीकनिहाय विचार करता, मक्याची उच्चांकी पेरणी झाली आहे. मक्याचे क्षेत्र सरासरी ८,८५,६०८ हेक्टर आहे. सरासरीच्या तुलनेत १२१ टक्क्यांवर, म्हणजे १०,६७,२५७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उडदाचे सरासरी क्षेत्र ३,७०,२५२ हेक्टर आहे. सरासरीच्या १०६ टक्क्यांवर, ३,९२,८४७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४१,४९,९१२ हेक्टर असून, सरासरीच्या ११९ टक्के, ४९,४१,९४४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हेही वाचा - पूजा खेडकर यांना केंद्र शासनाच्या कर्मचारी, प्रशिक्षण विभागाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस कोकण किनारपट्टीवर उशिराने पाऊस सक्रिय झाल्यामुळे भाताची पेरणी रखडली होती. आता भातलागवडीने वेग घेतला आहे. भातलागवड ६७ टक्के, बाजरी ५८ टक्के, रागी ६९ टक्के आणि राजगिरा, कोडू, कोद्रा, कुटकी, वरई, सावा, राळा या तृणधान्यांची पेरणी सरासरीच्या ६१ टक्के, २४,७३४ हेक्टरवर झाली आहे. पुढील दहा दिवसांत भाताच्या लागवडीही पूर्ण होतील. कडधान्याची पेरणी सरासरीच्या ८८ टक्के झाली आहे. कडधान्याची लागवड सरासरी २१,३८,५७१ हेक्टरवर होते, आतापर्यंत १८,८०,६९५ हेक्टवर पेरणी झाली आहे. कडधान्याचा पेरणी कालावधी संपल्यामुळे आता कडधान्याचे पेरणी क्षेत्र स्थिर राहण्याचा अंदाज आहे. तुरीची पेरणी ९२ टक्के, मुगाची ५८ टक्के, कुळीथ, चवळी, मटकी, राजमा आदी कडधान्याची पेरणी ८० टक्क्यांवर झाली आहे. कापसाचे क्षेत्र सरासरी ४२,०१,१२८ हेक्टर असून, सरासरीच्या ९७ टक्के, ४०,५६,४२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तेलबियांची पेरणीत आघाडी राज्यात तेलबियांच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असून, ती सरासरीच्या ११६ टक्के आहे. तेलबियांचे सरासरी क्षेत्र ४३,९२,३४० हेक्टर असून, ५१,०३,६३५ हेक्टरवर लागवड झाली आहे. भुईमूगाची लागवड ७३ टक्के, तिळाची ४९ टक्के, कारळ १९ टक्के, सूर्यफूल ६७ टक्के, सोयाबीन ११९ टक्के आणि एरंडीसह अन्य तेलबियांची लागवड २२ टक्क्यांवर झाली आहे. हेही वाचा - शिक्षण विभागाचे अधिकारी करणार शाळांची तपासणी… १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान होणार काय? राज्यातील खरीप पेरण्यांनी सरासरी गाठली आहे. भातवगळता अन्य पेरण्या जवळपास संपल्या आहेत. पुढील चार-पाच दिवसांत कोकणातील आणि दहा दिवसांत विदर्भातील भाताच्या लागवडी पूर्ण होतील. सर्वदूर चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यभरात वेळेत पेरण्या झाल्या आहेत. अपवादवगळता पीकस्थिती उत्तम आहे.- विनयकुमार आवटे, कृषी संचालक, विस्तार आणि प्रशिक्षण