पिंपरी : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील आळंदी नगरपरिषद, चाकण नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर मतदारसंघातील ग्रामीण भागात मात्र शिवसेना (ठाकरे) पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जिल्हा परिषदेच्या आठ पैंकी पाच जागांवर विजय मिळवला आहे. खेड पंचायत समितीच्या १६ पैंकी नऊ जागा जिंकत एकहाती सत्ता आली आहे.

पंचायत समितीवरील सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसला गमवावी लागली आहे. ड-आळंदी विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे वर्चस्व होते. परंतु, या वर्चस्वाला शिवसेना (ठाकरे) पक्षाने धक्का दिला. आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीत १६ पैकी नऊ सदस्य विजयी झाले आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाची एकहाती सत्ता आली आहे.  जिल्हा परिषदेच्या आठ पैंकी पाच जागा शिवसेनेने (ठाकरे) जिंकल्या आहेत.  माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला पंचायत समितीत केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषदेत तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

शिवसेना (शिंदे) पक्षाचा पंचायत समितीत एक उमेदवार निवडून आला आहे. भाजप, राष्ट्रवादी काँगेस, शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी प्रचार केला होता. दुसरीकडे शिवसेना (ठाकरे) गटाची एकही मोठी सभाही झाली नव्हती. दिग्गज नेते प्रचारासाठी फिरकलेही नव्हते. त्यानंतरही शिवसेना (ठाकरे) पक्षाने यश मिळवले आहे.

आमदारांच्या बहिणीचा पराभव

आमदार बाबाजी काळे यांनी तालुक्यावर वर्चस्व मिळवले आहे. मात्र, त्यांच्या बहिणीचा पाईट-आंबेठाण गटातून पराभव झाला आहे. भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले शरद बुट्टे-पाटील यांच्या पत्नी सुनिता यांनी आमदार काळे यांच्या भगिणी राजश्री जैद यांचा ४०० मतांनी पराभव केला. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची मुलगी विनया मुंगसे या कुरुळी गटातून शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून निवडून आल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार

कुरुळी गटातून  विनया मुंगसे, मेदनकरवाडी गणेश आरगडे, पिंपळगाव विजयसिंह शिंदे, रेटवडी-वाफगाव दिप्ती भोगाडे आणि कडूस गटातून तनुजा घनवट हे शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून विजयी झाले आहेत.  नाणेकरवाडी-म्हाळुंगे गटातून गणेश बोत्रे,वाडा-वाशेरे – समीर सुपे आणि  पाईट-आंबेठाण गटातून सुनीता बुट्टे-पाटील हे तीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत.

पंचायत समितीचे विजयी उमेदवार

मंगेश सावंत, रूपाली कांबळे, कविता राक्षे, ज्ञानेश्वर ढेरंगे,  दिलीप डुबे,  विद्या मोहिते, प्रसाद घेनंद, सुनिता गोगावले आणि गौरी मुऱ्हे हे नऊ उमेदवार शिवसेना (ठाकरे) पक्षाचे निवडून आले आहेत. महेंद्र मेदनकर, अश्विनी तरस, दिनेश हांडे, शंकर कावडे,  श्रद्धा मांडेकर आणि निखिल थोरवे हे सहा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत.  मनीषा हिले या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत.