पिंपरी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मित्राने तरुणावर चाकूने वार करून त्याचा खून केला. ही घटना बुधवारी (११ फेब्रुवारी) रोजी रात्री पावणे दहा वाजताच्‍या सुमारास खेड तालुक्‍यातील नाणेकरवाडी येथे घडली. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

किशोर सुरेश राणे (२५) असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. कपिल जितेंद्र कोसलकर (नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. योगेश दत्तात्रेय नाणेकर (३०, नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याचा मित्र किशोर राणे याच्यावर धारदार चाकूने छातीवर व बरगड्यांवर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला चाकण येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चाकण दक्षिण पोलीस तपास करत आहेत.

जमीन व्यवहारात ७.२५ लाखांची फसवणूक

जमीन विक्रीच्या बहाण्याने ७ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना धानोरे (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी तीन जणांच्‍या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्‍याकडून धनादेशाद्वारे सात लाख २५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्‍याबदल्‍यात फिर्यादी यांना जमीन देण्याचे आश्वासन दिले; मात्र ती जमीन दुसऱ्यालाच विकली. तसेच फिर्यादी यांचे पैसेही परत केले नाहीत. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

ऑनलाइन जुगार प्रकरणी तरुणास अटक

प्रतिबंधित ऑनलाइन बेटिंग वेबसाइटद्वारे जुगार खेळताना तरुणास अटक करण्यात आली. ही कारवाई मुळशी तालुक्‍यातील मारुंजी येथे बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

सचिन प्रभुराम चौधरी (१९, गुरुकृपा रेसिडन्सी, मारुंजी) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई कारभारी पालवे (३५) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन चौधरी हा एका वेबसाईटवरून विनापरवाना ऑनलाइन जुगार खेळत होता. बनावट कागदपत्रांद्वारे बँक खाते उघडून तसेच सिमकार्डच्या आधारे आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

जागा देण्याच्या बहाण्याने एक कोटींची फसवणूक

जागा खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी १० लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना २०११ ते १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पुणे जिल्‍ह्याच्‍या मुळशी तालुक्‍यात घडली.

याबाबत ४५ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांना मुळशी तालुक्यातील जागा खरेदी करून देतो असे सांगितले होते. त्यासाठी २०११ पासून आरोपींनी वेळोवेळी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्‍याकडून रोख व खात्याद्वारे रक्कम घेतली; मात्र जागा किंवा दिलेले पैसेही परत न देता त्यांची तब्बल एक कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

मित्राला भेटण्‍यासाठी गेलेल्‍या तरुणास सलूनमध्ये मारहाण

सलूनमध्ये मित्राला भेटण्‍यासाठी गेलेल्‍या तरुणाशी झालेल्या वादातून त्‍यास कात्रीने मारहाण करून जखमी केले. ही घटना तळवडे येथे बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास घडली.

लालबाबू ऊर्फ बबलू चौहान (४५, तळवडे) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कन्हैयाकुमार दिनेश शर्मा (२२, संत तुकाराम नगर, तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास फिर्यादी हे आपल्‍या मित्राला भेटण्‍यासाठी सलूनमध्‍ये गेले होते. त्‍यावेळी झालेल्‍या शिवीगाळीच्या वादातून आरोपीने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच केस कापण्याच्या कात्रीने वार करून जखमी केले. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.

ट्रकच्‍या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्‍या अपघातात दुचाकीस्‍वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री सव्‍वानऊ वाजताच्‍या सुमारास जाधववाडी, चिखली येथे घडली.

अनिल पांडुरंग कांबळे (२५) असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या तरुणाचे नाव आहे. या अपघात प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुनिल पांडुरंग कांबळे (२९, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्‍वानऊ वाजताच्‍या सुमारा भरधाव वेगातील ट्रकने पल्सर दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात अनिल कांबळे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करत आहेत.