पुणे : गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना खेड शिवापूर टोलनाक्याजवळ घडली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी टँकरचालकाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. नागरिकांनी टँकरवर दगडफेक केली. अपघातानंतर पुणे -सातारा रस्ता रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
राजेंद्र बबन मोरे (वय ५२), सविता मोरे (वय ४३, दोघे रा. वारजे माळवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी टँकरचालक राज किशन बी. (वय ३९) याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार मोरे दाम्पत्य शुक्रवारी (८ मे) दुपारी साताऱ्याकडे निघाले होते. खेड शिवापूर टोलनाक्याजवळ गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरने पाठीमागून दुचाकीला धडक दिली. टँकरच्या चाकाखाली कदम दाम्पत्य सापडले. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नागरिकांनी टँकर चालकाला चोप दिला. टँकरवर नागरिकांनी दगडफेक केली. टँकरचालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अपघातानंतर या भागात काही तणाव निर्माण झाला होता, तसेच वाहतूकही विस्कळीत झाली होती. राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. टँकरने दुचाकीस्वार कदम यांना ५० ते ६० फूट फरफटत नेले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शहरात भरधाव टँकरच्या धडकेत गेल्या काही दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी टँकरचालक, मालकांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षाविषयक नियमावलीची माहिती देऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते.
आंबे काढताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
आंबे काढताना उच्चक्षमतेच्या वीजवाहिनीला स्टील पाईपचा स्पर्श झाल्याने एका तरुणाला विजेचा धक्का बसला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बाणेरमधील प्रथमेश पार्क परिसरात शुक्रवारी दुपारी घडली.
शैबुद शेख (वय ३१, रा. शाहीदगंज, जि. झारखंड) असे मृत्युमुुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा मजुरी करतो. बाणेरमधील प्रथमेश पार्क परिसरात तो झाडावरील आंबे काढत होता. आंबे काढण्यासाठी त्याने स्टीलचा पाईप वापरला होता. झाडाजवळून जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या वीज वाहिनीला पाईपचा स्पर्श झाला. शाॅर्टसर्किट झाल्याने शेख याला विजेचा धक्का बसला. तो झाडाच्या फांदीत अडकला.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बाणेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख शिवाजी मेमाणे, विण्णू राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जवान ज्ञानेश्वर गायकवाड, राजेश भालचिम, संजय चौरे, विजय चव्हाण, साेनावळे यांनी दोर आणि शिडीचा वापर करून बेशुद्धावस्थेतील शेख याला झाडावरून उतरविले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
‘शहरात परप्रांतातून आलेले मजुरांचे गट झाडावरील कैरी, आंबे काढून देण्याचे काम करतात. बाणेरमधील आंब्याचे झाड हे सार्वजनिक ठिकाणी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेला शेख याला आंबे काढण्याचे काम कोणी दिले होते का ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे’, असे बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.
