पुणे : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाटी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण प्रकरण वेगळेच वळण लागले. शुक्रवारी सायंकाळी हिरे व्यापारी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात हजर झाला. कर्जबाजारी झाल्याने देणेकऱ्यांकडून देत असलेल्या त्रासामुळे अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली हिरे व्यापाऱ्याने पोलिसांना दिली.
बिबवेवाडी भागातील एका सोसायटीत हिरे व्यापारी राहायला आहे. सोमवारी मुलीला शाळेतून घेऊन व्यापारी आणि त्याची पत्नी सोसायटीच्या आवारात आले. त्यानंतर लष्कर भागात कामानिमित्त निघाल्याचे पत्नीला सांगून हिरे व्यापारी दुचाकीवरून बाहेर पडला. काही वेळानंतर हिरे व्यापाऱ्याच्या पत्नीच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने संपर्क साधला. तुमच्या पतीचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचे त्याने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. हिरे व्यापाऱ्याची दुचाकी बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात सापडल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले होते. सर्व शक्यता गृहित धरून पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तपासावर देखरेख ठेवली होती.
अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके हिरे व्यापाऱ्याचा शोध घेत होते. तपासासाठी बंगळुरू आणि मुंबईत पोलिसांची पथके रवाना झाली होती. व्यापाऱ्याचा मोबाइल क्रमांक बंद असल्याने तांत्रिक तपासात अडथळे आले होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी व्यापाऱ्याने मोबाइल संच सुरू केला आणि बहिणीशी संवाद साधला. त्यानंतर पुन्हा मोबाइल संच बंद करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी व्यापारी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात पोहोचला. काही जणांकडून कर्जाने रक्कम घेतली होती. देणेकऱ्यांच्या त्रासामुळे मी निघून गेलो. नवले पूल परिसरातून रावेत येथे गेलो. तेथून नवी मुंबईतील कळंबोलीत गेलो. मुंबई सेंट्रल, खार येथे दोन दिवस एका लॉजमध्ये वास्तव्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.