वैद्यकीय उपचारांना योगसाधनेची जोड दिल्याने शरीरावर त्याचे उपकारक परिणाम होत असल्याची प्रचिती एका व्यावसायिकाला आली आहे. एक किडनी काढल्यानंतर मूत्रिपड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यावर प्रसिद्ध योगोपचार तज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनोद यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित योगसाधना केल्यामुळे या व्यावसायिकाची कार्यक्षमता १७ वर्षांनंतरही टिकून राहिली आहे.
नितीन शहा यांनी आपल्याला आलेल्या या अनुभवाची माहिती मंगळवारी दिली. योगसाधनेमुळे आपल्याला केवळ नवे जीवनच मिळाले नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही लाभला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. गरजू रुग्णांच्या मदतीसाठी त्यांनी रांका, ताराचंद आणि आनंदऋषीजी या तीन रुग्णालयांना १२ डायलिसीस यंत्रे भेट दिली आहेत.
खासगी रुग्णालयात १९९८ मध्ये मूत्रिपडाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यावर मला २१ दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून आठ महिने मला बाहेर पडता आले नाही. या अवघड काळामध्ये कुटुंबीयांनी संपूर्ण जबाबदारी पेलली. पुढची चार वर्षे मास्क लावून वावरावे लागले. रोगनिदान झाल्यानंतर माझे कामही पूर्णपणे थांबले होते. या कालखंडात डॉ. संप्रसाद विनोद यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानुसार शास्त्रीय पद्धतीने योगसाधना सुरू केली आणि माझ्या आयुष्याला पुन्हा एकदा उभारी मिळाली असल्याचे नितीन शहा यांनी सांगितले.
वयाच्या २४ व्या वर्षी असह्य़ डोकेदुखी सुरू झाली. सुरूवातीला कोणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. नंतर काही महिन्यांनी थकवा येऊ लागला. भूक कमी झाली आणि पायावर सूज जाणवू लागली. वैद्यकीय तपासणीनंतर रक्तदाबाचे निदान झाले. अन्य तपासण्या झाल्यानंतर हिमोग्लोबिन कमी झाल्याचे ध्यानात आले. दोन्ही मूत्रिपम्डे आक्रसून गेली होती. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये चार महिने ठेवून डायलिसीस करण्यात आले. पुढची चार वर्षे पुण्यामध्ये डायलिसीस सुरू राहिले. मात्र, योग्य टप्प्यावर डॉ. संप्रसाद विनोद यांच्या मार्गदर्शनाखाली योगोपचार सुरू झाले. प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ. अभय हुपरीकर यांच्याकडे वैद्यकीय चाचण्या नियमितपणे सुरू असून औषधोपचारही घेत आहे. गेली १८ वर्षे न चुकता योगसाधना करीत असल्याने मी दररोज १२ ते १६ तास काम करू शकतो, असेही नितीन शहा यांनी सांगितले.