पुणे : मोठ्या माणसांसाठी वेगवेगळे क्लब, कट्टे, महिलांसाठी भिशी, किटी पार्टी असे उपक्रम होतात, पण मुलांसाठी शिकवणी वर्ग, कार्यशाळांपेक्षा वेगळे काही उपक्रम होत नाहीत. ही उणीव लक्षात घेऊन ‘संवाद पुणे’तर्फे राज्यात पहिल्यांदाच खास मुलांसाठी फिल्म क्लब सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत ८ ते १४ वयोगटातील मुलांना दर महिन्याच्या चौथ्या रविवारी चित्रपट दाखवण्यात येणार असून, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमही राबवण्यात येणार आहेत.

संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आणि महेश मोटकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. आजच्या वेगवान काळात पालक आणि मुले यांच्यातील संवाद कमी झाला आहे. मुले स्मार्टफोनमध्ये गुंतत चालली आहेत. त्यामुळे मुलांना समाज माध्यमांतील रील पाहण्यापेक्षा प्रबोधनात्मक, प्रेरणादायी चित्रपट पाहण्याची संधी मिळण्यासाठी फिल्म क्लब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेतर्फे लहान मुलांसाठी बालचित्रपट महोत्सवासह विविध उपक्रम राबवले जातात. त्यात आता फिल्म क्लबची भर पडणार आहे. पहिल्यांदाच लहान मुलांसाठी स्वतंत्र फिल्म क्लब सुरू होत आहे. तसेच मुलांमध्ये सर्जनशीलता, नेतृत्वगुण, संघभावना आणि कार्यक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा, कार्यशाळा, संवाद सत्रे आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यात लेखकांशी संवाद, पुस्तक प्रकाशन अशा कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. सारथी संस्थेच्या प्रेक्षागृहात हा फिल्म क्लब चालवण्यात येणार आहे. मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन चित्रपटांची निवड करण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील जाणकारांची मदत घेतली जाणार आहे, असे सुनील महाजन यांनी सांगितले. या उपक्रमाअंतर्गत २३ ऑगस्ट रोजी पहिला चित्रपट दाखवला जाणार आहे.

येत्या काळात मुलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध आरोग्यविषयक योजना, शासकीय व खासगी आरोग्य सुविधांची माहिती तज्ज्ञांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तसेच मुलांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी ऑनलाइन समुपदेशन, समाज माध्यमांचा सुरक्षित, सकारात्मक वापर, करिअर मार्गदर्शन आणि जीवनकौशल्य विकास या संबंधी विशेष सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. शिक्षण, क्रीडा, कला, विज्ञान किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुलांचा विशेष गौरव केला जाणार आहे, असे मोटकर यांनी सांगितले. हा उपक्रम सशुल्क असून, सहभागी होण्यासाठी http://www.samwadpune.com या संकेतस्थळावर नोंदणी करणे, शुल्क भरणे, ओळखपत्र डाऊनलोड करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले.