पुणे ; १९७६ मध्ये मी परदेशातून भारतात परतलो तेव्हा माझा पगार दरमहा अवघा २,१०० रुपये होता. सहा जणांच्या कुटुंबाचा सांभाळ करताना स्वतःचे वाहन घेणे परवडणारे नव्हते. अशा काळात ‘काइनेटिक लुना’ने आमच्या कुटुंबाला मोठा दिलासा दिला,” अशा शब्दांत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या जगण्याशी जोडल्या गेलेल्या ‘लुना’ गाडीच्या रंजक आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते उद्योजक आणि कायनेटिकचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांच्यावरील मिस्टर आर अँड डी; द वे अहेड या पुस्तक प्रकाशन समारंभाचे. माशेलकर यांच्या हस्ते बुधवारी पुण्यात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या पुस्तकांमध्ये उद्योजक अरुण फिरोदिया यांच्या कार्याचा प्रवास तर आहेच पण त्याचबरोबर देशांमध्ये दुचाकींचा प्रवास कसा झाला याचे रंजक वर्णनही आहे. हाच धागा पकडत माशेलकर यांनी लूुना आठवणी जlगावल्या.
‘लुना’ केवळ वाहन नाही, कौटुंबिक प्रवासाची साथीदार!
आपल्या मध्यमवर्गीय संघर्षाचे दिवस आठवत डॉ. माशेलकर म्हणाले, “सुरुवातीला सार्वजनिक वाहतूक हाच आमचा एकमेव पर्याय होता. पुढे माझ्या पत्नीने वैशालीने लुना घेतली. जेव्हा आम्ही पाषाण रोडवरील ‘एनसीएल’ कॉलनीत राहायला गेलो, तेव्हा मुलांची धावपळ आणि मुलीला तबल्याच्या क्लासला पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी वैशालीने याच लुनावरून लीलया पेलली. काल रात्रीही आम्ही दोघे या सुंदर आठवणींमध्ये रमलो होतो.”
गरजेतून जन्मलेले ‘सॉल्यूशन इंजिनिअरिंग’
‘चल मेरी लुना’ ही केवळ जाहिरात नसून ती भारतीय मध्यमवर्गीयांच्या आठवणींचा भाग बनली होती, असे सांगून डॉ. माशेलकर पुढे म्हणाले कि, “सायकल आणि स्कूटर यामधील एक परवडणारे वाहन म्हणून एच. के. फिरोदिया यांनी भारतातील अपूर्ण गरज ओळखली. तर अरुण फिरोदिया यांनी आपल्या ‘सॉल्यूशन इंजिनिअरिंग’च्या कौशल्यातून ही अत्यंत हलकी, दणकट आणि सामान्य माणसाला परवडणारी भारतीय दुचाकी साकारली.”
‘लुना’ हे केवळ एक उत्पादन नसून भारतीय लोकांच्या संवेदनशील गरजा समजून घेतलेले एक क्रांतिकारी नवसंशोधन होते, असेही डॉ. माशेलकर यांनी आवर्जून नमूद केले.
