आपले खूप नाव व्हावे असे प्रत्येक कलाकाराला वाटते. त्यासाठी तो परदेशात जाऊन मैफली सादर करतो. पण, कलाकार परदेशी जातो तो आपल्या फायद्यासाठी. त्यांच्यासाठी गेला असता तर, एखादा तरी परदेशी कलाकार शास्त्रीय संगीत गाताना दिसला असता. मात्र, आपण तेथून पुस्तके घेऊन येतो आणि इथे फ्यूजन करतो. सोन्याचा बंगला बांधण्याची माझी इच्छा नाही. त्याऐवजी सोन्याचा स्वर आला तर आयुष्य सार्थकी लागेल असे वाटते, अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी रविवारी भावना व्यक्त केली. भारतामध्ये जो श्रोता लाभतो ते भाग्य परदेशात लाभत नाही. परदेशात गेले, तर भारतीय मुले संगीत शिक्षणापासून वंचित राहतील. मी राजकारणात नसले तरी याबाबतीत मी अगदी राष्ट्रवादी आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. नाटय़संपदा प्रतिष्ठानतर्फे ‘स्वरार्थ-रमणि’ या ग्रंथातील ‘राग-नाटय़’ या विषयावर किशोरी आमोणकर यांच्याशी प्रसिद्ध गायिका नंदिनी बेडेकर यांनी संवाद साधला. प्रसिद्ध गायक रघुनंदन पणशीकर यांनी किशोरीताईंचे स्वागत केले. कलाकार हा प्रतिभा आणि साधना अशा दोन अंगांनी व्यक्त होत असतो. प्रतिभा ही शक्ती आपल्या हातात नाही. त्यामुळे साधना करण्याला पर्याय नाही. आपसूकपणे येणारी तान रागाची म्हणून येते आणि नंतर प्रतिभा जागी होते. उत्कट होऊन प्रकटते ती प्रतिभा, असे सांगून किशोरीताई म्हणाल्या, सूर हा मुळातच भाव असल्याने तो भाव गायनातून संक्रमित होतो. त्यामुळे स्वरांच्या गुंजनाची मोहिनी रसिकांवर पडते. दोन भिन्न राग गातानाही एका रागाची शकले दाखविता येतात. एका देहाला एकच आत्मा असतो. हा आत्मा म्हणजे वादी. हा वादी शोधण्याची प्रक्रिया ही साधनेतूनच शक्य होते. ईश्वरी साक्षात्कार झाला पाहिजे म्हणून गाणं कर असे मला माईने (गानतपस्वी मोगुबाई कुर्डीकर) सांगितले. सुपरफास्ट तान मी वयाच्या १६ व्या वर्षी शिकले. माईने माझ्याकडून एक तान १०८ वेळा घोटून घेतली. पहिला कार्यक्रम करण्याची परवानगी दिली, तेव्हा मी ३६ वर्षांची होते. लोकप्रिय होण्यासाठी घाई करण्यापेक्षा गुरूने कलाकाराला संयम शिकविला पाहिजे. शास्त्राने आम्हाला इतके बांधून ठेवले आहे की मोकळे व्हायलाच तयार नाही. शास्त्र हा मार्ग आहे. नाही तर येणारा एकसुरीपणा हा कलेचा मृत्यूच ठरेल. आमचे परमदयाळू सरकार रात्री दहानंतर संगीताचे कार्यक्रम बंद करते. प्रहरात, भावनेत आणि अस्तित्वामध्ये जे बदल होतात, ते आमच्या संगीतातून गेलेच आहेत, असेही आमोणकर म्हणाल्या.