पुणे : करोना विषाणू संसर्गाचे निदान आता अवघ्या वीस सेकंदात करणे शक्य होणार आहे. पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स आणि पोर्टलँड स्थित हेमेक्स हेल्दकेअर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘गॅझेल – पॅथोकॅच’ असे या चाचणी संचाचे नाव आहे. करोना साथरोग काळात संपूर्ण भारतीय बनावटीचे करोना चाचणी संच विकसित करण्यात मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स ही कंपनी आघाडीवर राहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गॅझेल पॅथोकॅच या चाचणी संचाद्वारे अवघ्या वीस सेकंदात करोना विषाणूच्या सर्व प्रकारांच्या संसर्गाचे निदान होणार आहे. चाचणी संचाची अचूकताही पीसीआर चाचण्यांच्या तोडीस तोड असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर चाचणी संच आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी अमेरिकन एफडीएच्या मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. लवकरच आफ्रिका आणि मध्यपूर्वेत त्याचे अनावरण होणार असल्याचे मायलॅबतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ म्हणाले, करोना चाचण्या आणि निदान प्रक्रिया अधिक वेगवान आणि परिणामकारक करण्यासाठी हा चाचणी संच महत्त्वाचा ठरेल असा विश्वास वाटतो. आंतरराष्ट्रीय उत्पादकांसाठी उत्कृष्ट दर्जाचे आणि अचूक परिणाम दर्शवणारी उत्पादने विकसित करण्यातील आमची क्षमता आम्ही सिद्ध केल्याचे रावळ यांनी स्पष्ट केले. गॅझेल पॅथोकॅच चाचणी संचामध्ये करोना विषाणूचे न्यूक्लियोकॅप्सिड प्रथिन शोधण्यासाठी एक विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्याच्या मदतीने या चाचणीतून विषाणूचे त्वरित निदान करणे शक्य आहे. नाकातील नमुन्यांचा वापर करुन गॅझेल पॅथोकॅच संचाद्वारे केलेल्या चाचण्या आणि आरटी-पीसीआर चाचण्यांच्या तुलनेतून संचाची अचूकता सिद्ध करण्यात संशोधकांना यश आले आहे. ही अचूकता तब्बल ९९.७ टक्के एवढी आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kit detecting covid 19 variants within 20 seconds by discovery solutions pune print news zws
First published on: 11-07-2022 at 19:58 IST