पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडीमध्ये अनैसर्गिक शरीर संबंधास नकार दिला म्हणून एका ४० वर्षीय व्यक्तीने २९ वर्षीय तरुणावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास म्हाळुंगे येथील बंगळुरू-मुंबई सर्व्हिस रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय फिर्यादी तरुण हा चिंचवड येथे राहतो, तर ४० वर्षीय आरोपी हा काळेवाडी परिसरात राहतो.  दोघांची ओळख जिममध्ये झाली, त्यांच्यात मैत्री जमली. मैत्रीचे रुपांतर अनैसर्गिक संबंधात झालं, असं पोलिसांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी आरोपीचा विवाह झाला, याची कल्पना फिर्यादीला नव्हती. त्यानंतर सोमवारी दोघेही म्हाळुंगे येथे बंगळुरु -मुंबई सर्व्हिस रोडवर फिरायला गेले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला अनैसर्गिक शरीर संबंधाची मागणी केली. मात्र, तुझा आता विवाह झाला असून हे बरोबर नाही असं फिर्यादीने सांगितले. त्याचं उत्तर आणि नकार ऐकून आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने फिर्यादी तरुणाच्या हाताच्या तळव्यावर चाकूने वार केले. यामध्ये फिर्यादी जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर २९ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलिसात तक्रार दिली आहे.