कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्यातील राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. अशातच भाजपाकडून हेमंत रासने आणि काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांनी सोमवारी (६ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्या संपत्तीचे तपशीलही जाहीर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिज्ञापत्रांनुसार, भाजपा उमेदवार हेमंत रासने यांची एकूण संपत्ती १० कोटी ५१ लाख रुपयांची आहे. दुसरीकडे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांची एकूण संपत्ती ७ कोटी २० लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवारांनी सादर केलेल्या आयकर कागदपत्रांमध्ये करोना लाटेनंतर त्यांचं उत्पन्न घटल्याचं सांगितलं आहे.

रासनेंचं शिक्षण १२ वी, तर धंगेकरांचं शिक्षण ८ वी

हे दोघेही पुण्यातील मध्यवर्ती भागातील रहिवासी आहेत. त्यामुळे या भागातील घर, जमीन यांच्या किमती अधिक आहेत. दोघांचाही व्यवसाय शेती आणि रिअल इस्टेट आहे. विशेष म्हणजे कोट्याधीश असलेल्या रासनेंचं शिक्षण १२ वी आहे, तर धंगेकरांचं शिक्षण ८ वी आहे. दोघांकडेही ग्रामीण भागात शेती आणि बिगरशेती जमीन आहे.

रासने आणि धंगेकर तीनवेळा पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक

रासने आणि धंगेकर दोघांच्याही मागे कसबा मतदारसंघातील गणेश मंडळांची ताकद आहे. दोघांनीही याआधी तीनवेळा पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम केलं आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीला होणाऱ्या कसबा पोटनिवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : महापौरांच्या संपत्तीत सव्वा कोटीची वाढ

ब्राह्मण समाजाचा प्रभाव असणाऱ्या कसबा मतदारसंघाची समीकरणं मागील काही वर्षात बदलली आहेत. त्यामुळेच भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी ब्राह्मण समाजाबाहेर उमेदवारी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about property of bjp congress candidate hemant rasane ravindra dhangekar kasaba pune pbs
Show comments