लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : गेल्या आठ दिवसांपासून भक्तिभावाने गणेशाची सेवा केलेल्या कार्यकर्त्यांना आता वाजत-गाजत निघणाऱ्या वैभवशाली मिरवणुकीने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याचे वेध लागले आहेत. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून अनंत चतुर्दशीला गुरुवारी (२८ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता विसर्जन मिरवणुकीने सुरुवात होणार असून मानाच्या गणपती मंडळांची पथके निश्चित झाली आहेत. गणेश विसर्जनाच्या तयारीला वेग आला असून विसर्जन मिरवणूक थाटामाटात निघावी यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे.




गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सवाची वैभवशाली सांगता करण्याच्या उद्देशातून वाजत-गाजत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीने गणरायाला गुरुवारी निरोप देण्याची जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू झाली आहे.
श्री कसबा गणपती मंडळ
पारंपरिक चांदीच्या पालखीतून ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंडळ या मानाच्या पहिल्या गणपतीची मिरवणूक सकाळी उत्सव मंडपातून लोकमान्यांच्या पुतळ्याकडे मार्गस्थ होणार आहे. ठीक साडेदहा वाजता आरती झाल्यानंतर बेलबाग चौकातून मिरवणूक बेलबाग चौकातून मार्गस्थ होईल. नगारावादनाचा गाडा, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडियाचे पथक सहभागी होणार आहे. रमणबाग प्रशाला, रुद्रगर्जना आणि कलावंत ढोल-ताशा पथकांचा निनाद ऐकायला मिळणार आहे.
आणखी वाचा-विसर्जन सोहळ्यासाठी पुण्यातील ‘हे’ १७ रस्ते राहणार उद्या बंद
श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ
पारंपरिक पेहरावातील अश्वारुढ कार्यकर्ते हे ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीच्या मिरवणुकीचे आकर्षण असेल. सतीश आढाव यांचा नगारावादनाचा गाडा, समर्थ प्रतिष्ठान आणि ताल ढोल-ताशा पथकांचे वादन, चांदीच्या पालखीपुढे विष्णुनाद पथकाच्या वादकांचा शंखनाद असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षानिमित्त शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने खास शिवराज्याभिषेक रथ साकारला आहे. न्यू गंधर्व ब्रास बँडचे वादक हनुमान चालीसा आणि मंगल अमंगल हरी या रामायण चौपाईचे वादन करणार आहेत.
गुरुजी तालीम मंडळ
स्वप्निल व सुभाष सरपाले आणि अविनाश जिंदम यांनी साकारलेल्या जय श्रीराम ’रामराज्य’ या आकर्षक पुष्परथामध्ये विराजमान गणरायाची मूर्ती हे गुरुजी तालमी मंडळ या मानाच्या तिसऱ्या गणपतीच्या मिरवणुकीचे आकर्षण असेल. जयंत नगरकर यांचा नगारावादनाचा गाडा, गंधर्व बँडपथक, फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके तसेत ढोल- ताशा पथकांचे वादन ऐकायला मिळेल. नादब्रह्म आणि नादब्रह्म ट्रस्ट या दोन ढोल-ताशा पथकांचा निनाद दुमदुमणार आहे.
आणखी वाचा-पुणे: गणेशोत्सवात मोबाइल चोरणारी झारखंडमधील टोळी गजाआड; ५२ मोबाइल जप्त
तुळशीबाग मंडळ
महाकाल रथातून श्री तुळशीबाग गणपती या मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक निघणार आहे. २८ फूट उंचीच्या रथामध्ये फुलांनी सजवलेली १२ फूट उंचीची महाकाल पिंड असेल. लकडी पुलाजवळील मेट्रो पुलामुळे उंचीला मर्यादा असल्याने यंदा पहिल्यांदाच रथामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. उज्जैन येथील श्री महाकालेश्वराच्या सवारीची आठवण या मिरवणुकीने होईल, उज्जैनचे अघोरी महाराज यांचा सहभाग असेल. लोणकर बंधूंचा नगारावादनाचा गाडा, स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी, शिवप्रताप ही ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहे.
केसरीवाडा गणेशोत्सव
टिळक पंचांगानुसार १७ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठापना झालेल्या केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचव्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला गुरुवारी होणार आहे. फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत श्रीगणेशमूर्ती विराजमान असणार आहे. बिडवे बंधूंच्या नगारावादनाच्या गाड्यासह मिरवणुकीत शिवमुद्रा, श्रीराम आणि राजमुद्रा ढोल-ताशा पथकांचे वादन पुणेकरांना ऐकायला मिळणार आहे. तर इतिहासप्रेमी मंडळाकडून ‘चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक’ हा देखावाही मिरवणुकीच्या आकर्षणाचे केंद्र असेल.
आणखी वाचा-‘म्हाडा’च्या घरांसाठी मिळणार ७० हेक्टर जमीन, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात आहेत जमिनी
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
फुलांनी सजविलेल्या पारंपरिक लाकडी रथात विराजमान श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणरायाची मिरवणूक निघणार आहे. सायंकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांचे वादन आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. समर्थ पथक, रमणबाग प्रशाला आणि श्रीराम ढोल-ताशा पथकांचा निनाद मिरवणुकीत ऐकायला मिळणार आहे. तर त्यासोबतच मर्दानी खेळाची प्रात्याक्षिके गणेशभक्तांना पाहावयास मिळतील. पारंपरिक पेहरावात कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
अखिल मंडई मंडळ
कलादिग्दर्शक विशाल ताजनेकर यांनी साकारलेल्या ‘विश्वगुरू’ रथामध्ये विराजमान अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची विसर्जन मिरवणूक नियोजित वेळेनुसार सुरू होईल. श्री स्वामी समर्थ यांची दहा फूट उंचीची मूर्ती रथावर असून, श्री दत्त महाराज यांचे थ्रीडी चित्र रथावर साकारण्यात आले आहे. रथामध्ये हायड्रोलिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, लकडी पुलावर रथाची उंची १५ फूट होणार आहे. जयंत नगरकर बंधू यांचा नगारा वादनाचा गाडा, गंधर्व बँडपथक, तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह आणि नादब्रह्म ढोल ताशा पथक ट्रस्टचे वादन ऐकायला मिळेल.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेशी सुसंगत श्री गणाधीश रथामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान होणार आहे. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे. मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी असेल. प्रभात, दरबार ही बँडपथके, स्व-रूपवर्धिनीचे ढोल-लेझीम पथक, सनई-चौघडा असेल. दरवर्षी मिरवणुकीला होणारा उशीर लक्षात घेता यंदा बेलबाग चौकातून दुपारी चार वाजता मंडळाची मिरवणूक सुरू होणार असून लक्ष्मी रस्त्याने गणपती मार्गस्थ होईल.