‘पुणे तेथे काय उणे’ म्हणतात, सांस्कृतिक-राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात पुणे नेहमीच अग्रेसर आहे कारण तसे द्रष्टे लोक आहेत इथे. इथे आहेत प्रगल्भ जाणिवा अन् म्हणूनच निसर्गाविषयक प्रेम असणाऱ्या काही द्रष्टय़ा लोकांनी निसर्ग जपण्यासाठी प्रयत्न केले. त्यातील एक डॉ. वा. द. वर्तक. ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ म्हणून नावलौकिक कमावला पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीची स्थापना केली. लोकांमध्ये जागृतीसाठी, निसर्ग भान येण्यासाठी गेली पंचवीसहून अधिक वर्षे ही संस्था निसर्ग जपण्यासाठी, वृक्ष लागवडीसाठी कार्यरत आहे. निसर्ग विषयक व्याख्याने आयोजित करून लोकांना आपल्या निसर्गसंपदेची ओळख करून देणे हा मुख्य हेतू आहे.

पुण्याला सार्थ अभिमान वाटावा असे प्रा. श्री. द. महाजन सर, डॉ. हेमा साने मॅडम, श्री. माधव गोगटे सर, डॉ. अजित वर्तकसर, डॉ. नलावडे, डॉ. डी. के. कुलकर्णी, श्री. गोडबोले असे संस्थेचे आधारस्तंभ आहेत. निसर्ग जपायचा म्हणजे काय करायचे हे लोकांना माहीत करून द्यायला हवे असे तज्ज्ञांचे म्हणणे असते. निसर्गाची विविधता हा भारतातला ठेवा, अन् हा ठेवा जपला जावा यासाठी आपल्या पूर्वजांनी एक प्रथा केली, जंगलाचा छोटा तुकडा देवाच्या नावाने राखण्याची. हे देवाचे जंगल म्हणजे देवराई. भारतात, महाराष्ट्रात, कोकणात, पुण्याजवळ अशा खूप देवराया आहेत. ज्या अनेक कारणांनी नष्ट होत आहेत. या देवराया लोकांना माहीत नाहीत, त्यांचे महत्त्वही लोक जाणत नाहीत तर त्या जपल्या जाणार कशा? या कारणानेच महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीने ‘मिशन देवराई’ हा प्रकल्प हाती घेतला. श्री. सुनील भिडे, डॉ. माणिक फाटक, डॉ. उमेश मुंडले, अभिजित कुलकर्णी, स्नेहल मॅडम यांच्या अथक परिश्रमांनी लोकांसाठी देवराईच्या भेटी, स्लाइड शो, व्याख्यान मालिका आयोजित केल्या गेल्या. भोपाळच्या राष्ट्रीय मानववंश संग्रहालयाचे देशभरातील देवरायांचे फिरते प्रदर्शन आयोजित केले गेले होते. त्यास पुणेकरांनी इतका भरभरून प्रतिसाद दिला की भोपाळची टीम थक्क झाली. डॉ. अभिजित खांडगे यांनी जी.पी.एस. वर काही देवरायांचे जुने व आत्ताचे मॅपिंग केले व देवराई जनजागृतीसाठी पुणे-गोवा सायकल रॅली काढली. हे सगळे का करायचे तर देवराई म्हणजे शेकडो वर्षांपूर्वीचे जंगल. जिथे मानवी हस्तक्षेप नाहीत. त्यामुळे स्थानिक जैवसंपदा जपली जाते. मोठाले वृक्षराज गारवी, अंजन वेल, करवंद वेल, आंबुळकी, माधवीलता असे महावेलींचे झोपाळे इथे बघायला मिळतात. अनेक यक्षपुष्पे, बुरशा, रानहळद, रानआलं, रत्नसुरण अशी कंदवर्गीय वनस्पती आढळतात. हिरडा, बेहडा, कुंभा, शिवण, काटेसावरीचे महावृक्ष असतात, अंजनकिंजळ, माकडलिंबू, आंबा, सुरंगी, साग असे अस्सल देशी वृक्ष असतात. या वृक्षांवर महावेलींचे जाळे पसरलेले असते. या वेलींच्या खोडाचे झोपाळे तयार होतात. हे नैसर्गिक झोपाळे तयार होण्यास शे-दीडशे वर्षे सहज जातात अन् आता मानवी हस्तक्षेपाने एका घावात हा ठेवा नष्ट होतो हे आपण कधी समजून घेणार?

mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Crowd of devotees on the occasion of Tukaram Beej sohala in Dehu
पिंपरी : देहूमध्ये तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त भाविकांची अलोट गर्दी
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

देवराईत वृक्षसंपदेव्यतिरिक्त इतर असंख्य जिवांचे अधिवास जपले जातात. हिरडय़ा बेहडय़ावर सर्पगरुडाची घरटी, धनेशांची ढोल्यातली घरटी आढळतात. काटेसावर, जांभळीवर मधमाशांची पोळी असतात. मुंग्यांची घरटी झाडांवरही आढळतात. विविध कोळी, फुलपाखरे पाहायला मिळतात. देवराईत वर्षांनुवर्ष पडलेला पानांचा गंध आपणास मोहित करतो. अचेतन दगडांवरचे हिरवे गालिचे मनास लुब्ध करतात. बहुतेक रायांमध्ये पाण्याचे स्रोत आढळतात. आजवर श्रद्धेने जपलेली ही संपदा आता धोक्यात आली आहे. म्हणूनच मिशन देवराई या मोहिमेची आखणी केली गेली आहे. आपण त्याचे शिलेदार होऊ शकता. केरळ असो वा कोकण कुठे फिरायला गेलात तर चौकशी करा जवळ कुठे नागकव्य आहे का? देवरहाट आहे का? त्याचे ठिकाण नोंदवा, शक्य तर स्थानिकांच्या मदतीने तेथील देवाची माहिती काढा कारण आपल्या पूर्वजांनी परंपरेने जपलेला ठेवा अनमोल आहे. विकासाच्या रेटय़ात आपण तो गमावणार का? आपण अंधश्रद्धा ठेवणार नाही अन् विज्ञानानिधिष्ठित दृष्टी नाही, अशी त्रिशंकू अवस्था झाल्याने हा ठेवा नष्ट होत आहे. देवराईतल्या घटकांचा परस्पर संबंध, दुर्मीळ झाडे, वनस्पती यांचा अभ्यास होणे व तशी नवीन वृक्षसंपदा निर्माण करणे आपल्या हातात आहे. अशी वृक्षसंपदा चिन्मय मिशनच्या कोळवण येथील विभूती आश्रमात निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. शास्त्रीय आधारावर वनसंपदेची जपणूक करणे, लोकांपर्यंत वैज्ञानिक माहिती पोचवणे हेच मिशन आहे. त्यासाठी देवराई जाणून घ्या. देवराई म्हणजे

वृक्षवेली पल्लवांचे आगर

काळूबाई सटवाई वाघजाईचे घर

महावेलींचे झुलतात झुले

भुईवर फुलतात यक्षाची फुले

हिरडय़ा बेहडय़ावर घरटी गरुडांची

ढोलीत वाढतात बाळे धनेशांची

अवचित कुठे शिल्प मातीचे

घर कष्टकरी कामकरी मुंग्यांचे

अचेतनावर फुलते हिरवाई

निसर्गाचे इवले रूप देवरहाटी देवराई

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)