पुणे : जागतिक पातळीवर कार्बन फूटप्रिंट कमी म्हणजेच उत्पादित करताना कार्बन उत्सर्जन कमी असलेल्या उत्पादनांना मागणी वाढू लागली आहे. यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उत्पादन प्रक्रिया कार्बन उत्सर्जनमुक्त करण्याची निकड सर्व उद्योगांसमोर निर्माण झाली आहे. त्यातूनच कोल्हापूरमधील फौंड्री उद्योगाने पर्यावरणपूरक पाऊल उचलून उत्पादन प्रक्रियेसाठी सौरऊर्जेचा वापर करण्यासोबत कच्चा माल म्हणून टाकाऊ व भंगार मालाचा वापर सुरू केला. यामुळे वर्षभरात ११ कंपन्यांनी एकत्र येऊन कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. कोल्हापूरमधील फौंडी उद्योगाने उचललेले पाऊल राज्यातील उद्योगांसाठी आदर्श ठरले आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीच्या (सीआयआय) मदतीने कोल्हापूरमधील ११ फौंड्री उद्योगांनी एकत्र येऊन ग्रीनप्रो कोल्हापूर फौंडी क्लस्टर हा पथदर्शी प्रकल्प राबविला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा प्रकल्प सुरू झाला. वाहननिर्मिती आणि अभियांत्रिकी कंपन्यांना लागणाऱ्या ग्रे आयर्न कास्टिंग, डक्टाईल आयर्न कास्टिंग आणि स्टील कास्टिंगचे उत्पादन हा फौंड्री उद्योग करतो. कास्टिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी ४५ ते ७० टक्के हरित वायू उत्सर्जन होते. यामुळे भंगार साहित्याचा पुनर्वापर करण्याचे पाऊल उचलण्यात आले. कच्च्या मालात भंगारचे प्रमाण वाढल्याने नवीन कच्च्या मालाचा वापर कमी होऊन एकूण कार्बन उत्सर्जन कमी करण्यात यश मिळाले. याचबरोबर साहित्याचा पुनर्वापर करण्यावर भर देऊनही कार्बन उत्सर्जन आणखी कमी करण्यात आले.
फौंड्री उद्योगाला मोठ्या प्रमाणात वीज लागते. धातू वितळविणे आणि इतर उत्पादन प्रक्रियांसाठी विजेचा वापर अधिक होतो. त्यामुळे क्लस्टरमधील कंपन्यांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारले. त्यातून त्यांनी महावितरणकडून मिळणाऱ्या विजेचा वापर कमी करण्यात यश मिळविले. महावितरणची वीज प्रामुख्याने औष्णिक असल्याने त्यामुळे उत्पादनासाठी होणाऱ्या एकूण कार्बन उत्सर्जनात वाढ होते. सौरऊर्जेमुळे उत्पादन तयार करण्याच्या प्रक्रियेतील हे कार्बन उत्सर्जन आणखी कमी करण्यास मदत झाली. ‘सीआयआय ग्रीनप्रो’ने या फौंड्री कंपन्यांच्या उत्पादनांना पर्यावरणपूरक निर्मिती म्हणून प्रमाणित केले आहे. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यांकडून या उत्पादनांना मागणी वाढत असून, व्यवसायात वाढ होत आहे.
उत्पादनाचे एकूण कार्बन उत्सर्जन (टक्क्यांत)
- कच्चा माल – ६२ टक्के
- ऊर्जा व इंधन – २७ टक्के
- वाहतूक – ८ टक्के
- कचरा व्यवस्थापन व इतर – ३ टक्के
कोल्हापूर फौंड्री क्लस्टरमधील कंपन्या
- कास्टको
- मार्व्हलस विमेरकेटी फौंडी
- मयुरा स्टील्स
- एस.बी.रिशेलर्स
- समर्थ फौंडी सर्व्हिसेस
- सप्रे प्रिसिजन टेक्नॉलॉजीज
- सरोज इंजिनीअर्स
- शकुंतला स्टील्स
- श्री स्फिअरोटेक
- सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रीज
- यश मेटालिक्स
आणखी कंपन्या सहभागी होणार
कोल्हापूरमधील ११ फौंड्री कंपन्यांतील प्रत्येकी एका उत्पादनाला सीआयआयतर्फे ग्रीन प्रमाणपत्र मिळाले असून, ही एक सुरुवात आहे. पुढील क्लस्टरमध्ये २० कंपन्या सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. फौंडी उद्योगामध्ये ऊर्जेची मोठ्या प्रमाणावर गरज असते. या उपक्रमामुळे ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासोबत पर्यावरणीय शाश्वततेच्या दिशेने पाऊल टाकणे शक्य झाले आहे, अशी माहिती सीआयआय दक्षिण महाराष्ट्रचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांनी दिली.
