पुणे : गावातील अस्पृश्यता शहरातही ज्या माणसाच्या वाटेला येईल, तो काय करेल? नामदेव ढसाळ नावाच्या तरुणाने विद्रोहाचा मार्ग स्वीकारला. महानगरांमध्ये भरलेल्या गावकुसाबाहेरच्या माण्सांच्या वेदनेतून नवे सांस्कृतिक विश्व साकारले. प्रस्थापित मूल्यांना ठाम नकार देत ‘तुही यत्ता कंची?’ असा सवाल विचारणारा समष्टीचा बंडखोर कवी रविवारी पुणेकरांना अनुभवता आला. लेखणीने अगणित सूर्य पेटवणाऱ्या ढसाळांच्या कवितांच्या अभिवाचनानंतर झिंदाबादच्या गर्जनेने सभागृहात ऊर्जा संचारली होती.

निमित्त होते, ‘साधना साप्ताहिका’च्या वतीने आयोजित ‘कोण नामदेव ढसाळ? तुही यत्ता कंची?’ या कार्यक्रमाचे. कवयित्री नीरजा, प्रज्ञा दया पवार, अभिनेत्री चिन्मयी सुमीत, अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमे, अक्षय शिंपी, दीपक राजाध्यक्ष, युवराज मोहिते या कलाकारांनी ढसाळ यांच्या कवितांचे अभिवाचन केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव त्यांनी दूरदृश्य माध्यमातून ढसाळ यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, ‘साधना साप्ताहिका’चे संपादक विनोद शिरसाठ या वेळी उपस्थित होते. नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे आकर्षण असलेल्या तरुण-तरुणींनी गर्दी केली होती.

कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या कवितांचा वापर असलेल्या महेश बनसोडे दिग्दर्शित ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘कोण नामदेव ढसाळ,’ असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाने उपस्थित केला होता. चित्रपटाची कथा दलित पँथर, युवक क्रांती दल या चळवळींवर आधारित असून, यामध्ये वापरण्यात आलेल्या कविता आक्षेपार्ह असल्याचे सेन्सॉर बोर्डाने सांगितले होते. ‘कोण नामदेव ढसाळ? आम्ही ओळखत नाही,’ असे उत्तरही सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने हा मुद्दा तापला होता. त्याला उत्तर देण्यासाठी युवराज मोहिते यांच्या संकल्पनेतून नामदेव ढसाळ यांच्या कविता, साहित्य, आठवणी यांच्यावर आधारलेला ‘कोण नामदेव ढसाळ ?’ हा कार्यक्रम महाराष्ट्रभर करण्यात येत आहे.

पुण्यात झालेल्या या कार्यक्रमात नामदेव ढसाळ यांच्या कवितांबरोबरच त्यांची भाषणे, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना-घडामोडींना उजाळा देण्यात आला. ढसाळ यांच्या ‘अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा,’ ‘रमाबाई आंबेडकर,’ ‘६ डिसेंबर,’ ‘आमच्या आळीतून जाताना,’ ‘माणसं भादरून पेपरवेटमध्ये कुणी बंद केलीत,’ ‘त्यांची सनातन दया,’ ‘ज्ञानोबा,’ ‘कामाठीपुरा,’ ‘मौलाना भेंडी बाजार,’ ‘संत फोकलंड रोड’ या कवितांचे अभिवाचन करण्यात आले.

‘हा तर सांस्कृतिक हस्तक्षेप’

नामदेव ढसाळ हे पर्यायी साहित्याचा केंद्रबिंदू होते. त्यांच्या कवितांचा हा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारचा ‘सांस्कृतिक हस्तक्षेप’ आहे, असे प्रज्ञा दया पवार यांनी सांगितले.