पुणे महानगरपालिकेतील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रभाग असणाऱ्या कोंढवा बुद्रुक येथील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत वाईट परिस्थितीत आहे. तुटलेले सुरक्षा कठडे, अपुरी प्रकाश व्यवस्था, कचरा, अपुऱ्या सुविधा अशा अनेक समस्या इथल्या नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. हे प्रश्न लवकर सोडविण्यात आले नाहीत, तर पुणे महानगर पालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दादाश्री कामठे यांनी या विषयाबाबत आवाज उठवला आहे. कोंढवा बुद्रुक येथील स्मशानभूमीची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. अत्यंत वर्दळीच्या कात्रज-कोंढवा रस्त्याला लागून स्मशानभूमी असल्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच स्मशानभूमीच्या आत देखील नागरिकांसाठी अपुऱ्या सुविधा आहेत. नागरिकांना अंत्यविधीसाठी रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. स्मशानभूमीच्या ठिकाणी असलेले संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी अंत्यविधीसाठी प्रकाशव्यवस्था अपुरी आहे. स्मशानभूमीमध्ये वायुप्रदूषण यंत्रणा अस्तित्वात नाही. स्मशानभमीला लागून ओढा असल्या कारणाने त्याठिकाणी कचरा अधिक मात्रेत साठला आहे. ज्यामुळे नागरिकांना दरुगधी सहन करावी लागत आहे. एकूण स्मशानभूमीची अवस्था अत्यंत वाईट आहे.
या संदर्भात कामठे यांनी सांगितले, की ही स्मशानभूमी पुणे महानगर पालिकेच्या अमेनिटी स्पेस असणाऱ्या कोंढवा बुद्रुक सर्वे नं. ३०/३१ या ठिकाणी प्रस्तावित केली आहे आणि त्यासाठी २० लक्ष रकमेची तरतूद करण्यात आली आहे. परंतु या जागेचा खटला हाय कोर्टात सुरू असल्यामुळे या ठिकाणी काम स्थगित ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही स्मशानभूमी नियोजन करून विकसित केल्यास कोंढवा बुद्रुकचा हा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल.



