पुणे : कोंढवा आणि पर्वती परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त केली.
अजित सागर कसबे (वय २१, रा. विघ्नहर्ता सोसायटी, आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कसबे याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दहशत माजविण्यासाठी त्याने पिस्तूल बाळगले असल्याची माहिती पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना मिळाली. त्यानंतर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले.
परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, सूर्या जाधव, अमित चिव्हे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सद्दाम शेख, अमोल दबडे यांनी ही कारवाई केली.
कोंढवा परिसरात पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. या प्रकरणी प्रकाश तुळशीराम पवार (वय २४, रा. वैदुवाडी, हडपसर), मुस्ताक इक्राइम शेख (वय २२, रा. अश्रफनगर, कोंढवा), ओंकार दयानंद पवार (वय २४,रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) यांना अटक करण्यात आली.
आरोपींबरोबर असलेले तीन साथीदार पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. कोंढवा परिसरात १३ मार्च रोजी खंडणी विरोधी पथक दोनमधील पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. आरोपी प्रकाश, मुस्ताक, ओंकार आणि साथीदार कोंढवा परिसरात थांबले होते. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक गौरव देव तपास करत आहेत.
