पुणे : दुचाकीस्वार शिक्षिकेचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार शिक्षिका कोंढवा बुद्रुक भागात राहायला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार शिक्षिका गुरुवारी (११ डिसेंबर) रात्री आठच्या सुमारास शिकवणी वर्गातून घरी निघाल्या होत्या.

काकडे वस्ती परिसरात दुचाकीस्वार शिक्षिकेच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून नेले. शिक्षिकेेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या चोरट्यंचा माग काढण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात पादचारी महिलांकडील दागिने, तसेच नागरिकांना धमकावून मोबाइल संच हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकाकडील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर भागात राहायला आहेत. १० डिसेंबर रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास ते कात्रज-कोंढवा रस्त्याने निघाले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवले.

पाेलीस असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी या भागात ज्येष्ठ नागरिकांकडील दागिने चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, अशी बतावणी चाेरट्यांनी केली. चोरट्यांकडे वही होती. ज्येष्ठ नागरिकाचे नाव लिहून घेण्याचा बहाणा चोरट्यांनी केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले.

ज्येष्ठाकडील सोनसाखळी काढून ठेवण्यास सांगितले. सोनसाखळी रुमाल बांधून देण्याचा बहाणा केला. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ९० हजार रुपयांची सोनसाखळी लांबविली. सोनसाखळी लांबविल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.

पोलीस असल्याची बतावणी, तसेच ज्येष्ठांना मोफत धान्य, साडी वाटप करण्यात येत असल्याची बतावणी करुन चोरट्यांकडून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. चोरट्यांच्या बतावणीवर विश्वासठेऊ नये. बतावण करणारे चोरटे आढळून आल्यास त्वरीत पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सिंहगड रस्ता, पर्वती, बाणेर परिसरात ज्येष्ठ नागरिकांकडे बताणी करुन दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या आहेत.