पुणे : दहावी-बारावीचा सर्वाधिक निकाल लागणारा विभाग अशी ओळख असलेल्या कोकण विभागीय मंडळातून प्रत्यक्षात दहावीची आणि बारावीची परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दशकभरात झपाट्याने कमी झाली आहे. विद्यार्थी संख्या रोडावण्यामागे रोजगाराचा अभाव आणि त्यापायी पुढील शिक्षणासाठी शालेय पातळीवर असतानाच स्थलांतर हे महत्त्वाचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. २०१२ मध्ये कोकण विभागीय मंडळाची स्थापना झाली. त्यापूर्वी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत होते. २०१२ मध्ये दहावीच्या ४५,३०३ विद्यार्थ्यांची नोंद झाली होती, ती आता २५,७७९ पर्यंत कमी झाली आहे. वर्षागणिक दहावीची विद्यार्थी संख्या घटत आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुरुवातीला वाढत जाऊन नंतर कमी झाली आहे. २०१२ मध्ये बारावीची विद्यार्थी संख्या २९,३४१ होती, २०१८ मध्ये ती ३३,५८८ पर्यंत वाढली. मात्र त्यानंतर त्यात घट होत यंदा २४,०१३ विद्यार्थ्यांची नोंद झाल्याचे राज्य मंडळाच्याच आकडेवारीवरून दिसून येत आहे.
‘केवळ दहावी-बारावीचीच नाही, तर पहिली ते नववीचीही विद्यार्थी संख्या कमी होत आहे. पूर्वीच्या तुलनेत आता घरोघरी मुलांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्याशिवाय नोकरी-रोजगारासाठी होणारे स्थलांतर हेही मुख्य कारण आहे. मासेमारी, पर्यटनातून पुरेशी रोजगारनिर्मिती होत नाही. उद्योगधंदे नसल्याने रोजगारासाठी मुंबई-पुण्याकडे जावे लागते. त्यामुळे शिक्षणासाठीही अनेक विद्यार्थी बाहेर पडतात,’ असे निरीक्षण मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी नोंदवले.
ते म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत सुरू झालेल्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचाही फटका बसतो आहे. सरकारच्या पटसंख्या धोरणामुळे शिक्षकांची संख्याही कमी होत आहे. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. कोकणातील स्थलांतर रोखण्यासाठी कायमस्वरूपी रोजगार देणारे उद्योगधंदे कोकणात येणे गरजेचे आहे. अन्यथा, स्थिती आणखी बिकट होईल.’
दापोलीच्या टाळसुरे येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे मुख्याध्यापक संदेश राऊत म्हणाले, ‘कुटुंबे रोजगारासाठी मुंबई, पुणे, ठाणे, तसेच परराज्यांत स्थलांतरित होत आहेत. सक्षम आर्थिक स्थिती असलेल्या पालकांकडून राज्य मंडळाऐवजी ‘सीबीएसई’सारख्या अन्य मंडळांना प्राधान्य दिले जाते. कोकणातील अर्थव्यवस्था शेती व मासेमारीसारख्या उद्योगांवर अवलंबून असल्याने नैसर्गिक आपत्ती, पावसाचे अनियमित प्रमाण यांमुळे कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात असल्याचे जाणवत आहे.’
‘जेईई, नीट आदी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनाची सुविधा नसल्याने दहावी-बारावीनंतर किंवा त्या आधीही विद्यार्थी बाहेरगावी जातात. लगेच आर्थिक स्रोत उपलब्ध करणारे आयटीआय, तंत्रनिकेतन, कौशल्य विकास अभ्यासक्रम या पर्यायांना ते दहावीनंतर प्राधान्य देतात. नवीन संचमान्यता धोरणामुळे विद्यालयातील शिक्षकांचे प्रमाणही कमी केले जात आहे. पालक वर्ग मोठ्या शहरांकडे वळत असल्याने कोकण मंडळातील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे,’ असे राऊत यांनी स्पष्ट केले.
कोकण विभागीय मंडळातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीची वर्षनिहाय आकडेवारी…
कोकण विभागीय मंडळातील विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. घटलेल्या जन्मदराबरोबरच स्थलांतर हे विद्यार्थी संख्या कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. बहुतांश मुले पुढील शिक्षण किंवा रोजगारासाठी प्रामुख्याने मुंबईला जातात. या भागात रोजगारनिर्मिती झाल्यास हे स्थलांतर थांबू शकेल. – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, कोकण विभागीय मंडळ
वर्ष – बारावी – दहावी
२०२६ – २४,०१३ – २५,७७९
२०२५ – २४,५२७ – २७,३७५
२०२४ – २६,८१४ – २७,३६०
२०२३ – २६,४२६ – २८,४३५
२०२२ – २९,९६६ – ३१,६३२
२०२१ – २७,३८४ – ३२,१६७
२०२० – ३०,८७३ – ३५,५८८
२०१९ – ३२,३०८ – ३४,७०८
२०१८ – ३३,५८८ – ३८,८९३
२०१७ – ३२,६७८ – ४०,९५४
२०१६ – ३२,९४९ – ४२,४०३
२०१५ – ३२,७०७ – ४१,४८८
२०१४ – ३३,७३३ – ४२,९४०
२०१३ – ३०,३६३ – ४३,९७३
२०१२ – २९३४१ – ४५३०३
(स्रोत : राज्य मंडळ)
