पुणे : कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्यात आला असून, पुणे, मुंबईतील घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस आवक होत आहे. आवक वाढल्यानंतर घाऊक आणि किरकोळ बाजारात दरात घट झाली आहे. हापूस सामान्यांच्या आवक्यात आला आहे. किरकोळ बाजारात एक डझन हापूसचे दर प्रतवारीनुसार ५०० ते ७०० रुपये दरम्यान आहे.

हवामान बदलामुळे कोकणात हापूसच्या लागवडीत घट झाली. हंगामाच्या पहिल्या टप्यात हापूसचे डझनाचे दर साधारणपणे २००० ते २५०० रुपये होते. अक्षय तृतीयेला हापूसच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी झाली होती. त्यामुळे एक डझन तयार हापूसला १८०० ते २००० रुपये असे दर मिळाले होते. सध्या कोकणातून मार्केट यार्डातील फळबाजारात आठ ते दहा हजार पेट्यांची दररोज आवक होत आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील आंबा व्यापारी नितीन कुंजीर यांनी दिली.

‘फळबाजारात हापूसची आवक वाढली आहे. हापूसचा हंगाम शेवटच्या टप्यात आला आहे. साधारणपणे आंब्याचा हंगाम २५ मेपर्यंत सुरू राहिल. यंदा हंगामाच्या दुसऱ्या टप्यात हापूसची आवक वाढली आहे. उष्मा वाढल्याने कोकणातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आंबा विक्रीस पाठविला आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक डझन हापूसचे दर ४०० ते ६०० रुपये दरम्यान आहेत’, असे आंबा व्यापारी करण जाधव यांनी सांगितले.

दरवर्षी साधारणपणे १० ते १५ मे नंतर हापूसची आवक तुरळक प्रमाणावर होते. यंदा हंगामाच्या शेवटच्या टप्यात आंब्याची आवक वाढली आहे.

आखातातील युद्धामुळे निर्यातीवर परिणाम

हापूस आंब्याची परदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. यंदा आखातातील युद्धामुळे निर्यातीवर परिणाम झाला. बदलत्या हवामानामुळे लागवडीवरही परिणाम झाला. बाजारात नेहमीच्या तुलनेत आंब्याची आवक कमी झाली. मात्र, निर्यात कमी प्रमाणावर होत असल्याने बाजारात हापूस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला. निर्यात सुरू असते तर हापूसचे दर तेजीत राहिले असते, अशी माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिली.

उष्मा वाढल्याने कोकणातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हापूस आंबा विक्रीस पाठविला आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्यातील ही आवक आहे. आंबा आवाक्यात आला आहे. मात्र, ग्राहकांकडून तशी मागणी कमी आहे. – करण जाधव, आंबा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड.

हापूसचे डझनाचे दर

घाऊक बाजार – ४०० ते ६०० रुपये
किरकोळ बाजार – ५०० ते ७०० रुपये