कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आज मोठ्या संख्येने नागरिक दाखल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी ७ वाजता येथील विजयस्तंभास अभिवादन केले. हा अभिवादन सोहळा शांततेत पार पडण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकुण ७४० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. याशिवाय सोशल मीडियावर देखील पोलिसांची करडी नजर आहे. २५० पेक्षा अधिक व्हॉट्स ग्रुप अॅडमिन्सना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा, सणसवाडी, येथील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

अभिवादनानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला नवीन वर्षाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे, येथील शौर्यस्तंभास एक वेगळा इतिहास आहे. दरवर्षी या ठिकाणी अभिवादनासाठी मोठ्यासंख्येने नागरिक येतात, मी राज्यातील जनतेच्यावतीने येथील शौर्यस्तंभास अभिवादन करतो. मध्यंतरी काही घटना घडल्या होत्या, मात्र सरकार त्यामध्ये चांगल्याप्रकारची काळजी घेत आहे. आज देखील पोलीस व प्रशासनाकडून बंदोबस्त अतिशय व्यवस्थित ठेवण्यात आला आहे. माझं या निमित्त नागरिकांना आवाहन आहे की, अनेकजण या ठिकाणी अभिवादनासाठी येत असतात, त्यांनी जरूर या ठिकाणी यावं परंतु येत असताना शांतता राखावी, कोणत्याही प्रकारे अफवा पसरवण्याचा जर कोणी प्रयत्न केला, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण, जातीय सलोखा कायम राखत, आनंदाने राहण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा आपण जतन केली पाहिजे.

तसेच, दोनच दिवसांपूर्वी मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर याठिकणी प्रथमच राज्यसरकाच्यावतीने भेट देण्यासाठी आलो आहे. या ठिकाणी आल्यानंतर मी पोलीस प्रशासनासह स्थानिक नेतेमंडळींशी देखील चर्चा केली आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांना अभिवादन कशाप्रकारे करता येईल, यासाठी व्यवस्था करण्यात आलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.