पुणे : ‘कोरेगाव भीमा परिसरातील पश्चिम बंगालमधील कामगाराचा खून हा भाषिक वादावरून झाला नाही. किरकोळ वादातून हा खून झाला असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले आहे’, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा भागात पश्चिम बंगलामधील एका कामगाराचा खून केल्याची घटना घडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री परप्रांतातून पुणे शहर, जिल्ह्यात कामानिमित्त स्थायिक झालेल्या कामगारांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमधील तरुणाचा खून हा भाषिक द्वेषातून झाल्याची टीका बॅनजी यांनी समाज माध्यमातून केली आहे. त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी खूनामागचे कारण किरकोळ वाद असल्याचे सांगितले. खूनामागे द्वेषभावना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुखेन महातो (वय २४, सध्या रा. कोरेगाव भीमा, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.‘ शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० फेब्रुवारी रोजी महातो मृतावस्थेत सापडला होता. महातो एका खासगी कंपनीत कामगार होता. ९ फेब्रुवारी दुपारी तीनच्या सुमारास तो कामावार जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. कोरेगाव भीमा परिसरात त्याने मद्यप्राशन केले. तो कामावर गेला नाही. ९ फेब्रुवारी रोजी त्याचा दोघांशी वाद झाला. वादातून त्याला मारहाण करुन तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले, अशी माहिती प्राथमिक चौकशी मिळाली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीनासाह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे’, अशी माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी दिली.

मद्याच्या नशेत त्याचे दोघांशी वाद झाला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, प्राथमिक चौकशीत महातो याने मद्यप्रशन केल्यानंतर त्याचा दोघांशी वाद झाला. त्याच्या खूनामागे अन्य कोणतेही कारण नाही, अशे त्यांनी नमूद केले.

पश्चिम बंगालमधील कामगार सुखेन महातो याचा पुणे परिसरात खून झाला. या प्रकरआतील आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी. हा गुन्हा द्वेषातून झाल्याची माहिती मिळाली आहे. कामगाराच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे ममता बॅनर्जी यांनी समाज माध्यमात दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे., असे ममता बॅनर्जी यांनी समाज माध्यमात दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.