पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी गुरुवारी (१ जानेवारी) आंबेडकरी चळवळीतील अनुयायांची होणारी गर्दी विचारात घेऊन पुणे पोलिसांकडून सहा हजार पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. गर्दीचे नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था, तसेच वाहतूक नियोजन करण्यास पोलिसांकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा परिसरात होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे.

‘विजयस्तंभ अभिवादन सोहळा, तसेच नववर्ष स्वागसाठी शहर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरेगाव भीमा परिसरात राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील हजारो अनुयायी गर्दी करतात. गर्दीचे नियोजन, तसेच संभाव्य अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

‘कोरेगाव भीमा परिसरात गुरुवारी (१ जानेवारी) सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास सहाय करणार आहेत. नववर्ष स्वागताच्या दिवशी पुणे शहरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भरधाव वेगाने वाहने चालविणे, तसेच मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष कारवाई (ड्रंक अँड ड्राईव्ह) करण्यात येणार आहे.

भरधाव वाहने चालविणे, वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. आप्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास ‘एनडीआरएफ’ ची पथके तैनात करण्यात येणारा आहे. जागोजागी मदत केंद्र उभी करण्यात आली असून, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी मनोरे उभे करण्यात आले आहेत, वाहनतळापासून विजयस्तंभापर्यंत ने-आण करण्यासाठी विसेष बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

नववर्ष स्वागताला तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

नववर्ष स्वागतासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन तीन हजार पोलिसांचा स्वतंत्र पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात येणार आहे. मद्यपी वाहनचालकांची नाकाबंदी करुन तपासणी करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेतील ८०० पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा स्वतंत्र बंदोबस्त असणार आहे.

नियम धुडकावणाऱ्या पब, रेस्टाॅरंटविरुद्ध कारवाई

‘राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांकडून नियमांची अमलबजावणी करण्यात येणार आहे. हाॅटेल, पब, बार चालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आवश्यक आहे. वेळेचे बंधन न पाळणे, अल्पवयीनांना मद्य विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार आहे’, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. खासगी ठिकाणी पार्टी आयोजन करणाऱ्यांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ध्वनीवर्धकाच्या आवाजाचा त्रास झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.