पुणे : मौजे पेरणे येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्याला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारी आंबेडकरी अनुयायांची गर्दी ध्यानात घेऊन २० लाख नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी अधिकाधिक संख्येने या सोहळ्याला उपस्थित रहावे, असे आवाहन कोरेगाव भीमा विजयस्तंभ दिन समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले आहे.
अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना पिण्याचे पाणी, पार्किंग, शौचालय यासह सर्वच पायाभूत सुविधा दरवर्षीपेक्षा अधिक संख्येने पुरविण्यात येणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमवेत झालेल्या बैठकांमध्ये नागरिकांकडून प्राप्त सूचनांच्या आधारे अंतिम नियोजन करण्यात आले आहे. समाजकंटक व चोरट्या लोकांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा उपद्रव होऊ नये यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे पहिल्यांदाच ड्रोनद्वारे ‘फेस स्कॅनिंग यंत्रणे’चा वापर करून कारवाई करण्यात येणार आहे.
अनुयायांची संख्या लक्षात घेता तब्बल १३ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त पुणे शहर व पुणे ग्रामीण या दोन्ही मार्फत या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. नागरिकांना सुरक्षितता व गोंधळाची परिस्थिती निर्माण न होऊ देणे या बाबीला प्राधान्यक्रम देत सुरक्षा व्यवस्थेसंदर्भामध्ये देखील पोलिसांनी सर्वतोपरी खबरदारीच्या उपायोजना केल्या आहेत, असे डंबाळे यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवंदनेचे शताब्दी वर्ष
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा विजयस्तंभाला भेट देण्याच्या घटनेला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाचे वर्ष हे बाबासाहेबांच्या मानवंदनेची शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. याची सुरुवात एक जानेवारी रोजी होत आहे, या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत विजयस्तंभावर अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांचे कुटुंबीय यांचा विजयस्तंभाला संयुक्त अभिवादन करण्याचा विशेष कार्यक्रम या वेळी घेण्यात आला आहे.
शौर्यस्तंभावरून ‘महार रेजिमेंट’ची स्थापना करण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये केली होती. या घटनेच्या अनुषंगाने दरवर्षी महार रेजिमेंटचे निवृत्त सैनिक या ठिकाणी लष्करी इतमामात मानवंदना देत आहेत. या वर्षी यशसिद्धी आजी-माजी सैनिक फाउंडेशनच्या वतीने सुमारे तीन हजार निवृत्त सैनिक राष्ट्रगीताद्वारे मानवंदना देणार आहेत. – राहुल डंबाळे, अध्यक्ष, कोरेगाव भीमा विजयस्तंभ दिन समन्वय समिती
