पुणे : परवानगीचे उल्लंघन करून पहाटे चार वाजेपर्यंत मद्य विक्री करण्याबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक सुरू ठेवत लोकांना त्रास देणाऱ्या कोरेगाव पार्कमधील हॉटेलमालकांसह सहा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरात हा पब व बार आहे. शासकीय नियमानुसार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत मद्य विक्री करण्यास परवानगी आहे. असे असताना हॉटेलमध्ये पहाटे चार वाजेपर्यंत मद्य विक्री केली जात होती. मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावून नागरिकांना त्रास दिला जात होता. १ नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेपर्यंत हा धिंगाणा सुरू होता.
परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून माहिती दिली. त्याबरोबरच कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तेव्हा तेथे मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक सुरू होता. काही जण मद्यपान करत होते. पोलिसांनी तेथील ध्वनियंत्रणा तसेच बिलिंग विभागातील सामुग्री जप्त केली असून मालकासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड तपास करीत आहेत.
